F&O Traders: फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करताय सावधान! गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांचे 1.81 लाख कोटी पाण्यात
esakal September 25, 2024 12:45 AM

Future And Options Investors Loss: फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये व्यवहार करणाऱ्या 1.13 कोटी व्यापाऱ्यांना 1.81 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 2023-24 या आर्थिक वर्षात फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांना 75,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार नियामक सेबीने इक्विटीच्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करताना गुंतवणूकदारांना झालेला नफा आणि तोटा यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

गुंतवणूकदारांचे सुमारे दोन लाख कोटींचे नुकसान

SEBIने आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2023-24 या तीन वर्षांच्या कालावधीत इक्विटीच्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये व्यापार करताना झालेल्या नफा आणि तोट्याचा अहवाल तयार केला आहे.

अहवालात, सेबीने म्हटले आहे की, या तीन आर्थिक वर्षांमध्ये व्यापाऱ्यांनी फ्युचर्स आणि ऑप्शन्समधील व्यापारामुळे 1.81 लाख कोटी रुपयांचे कष्टाचे पैसे गमावले आहेत. व्यापारात झालेल्या नुकसानीमध्ये व्यवहार खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे.

प्रति व्यापारी 1.20 लाख रुपयांचे सरासरी नुकसान

2023-24 या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे 75,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या 73 लाख व्यापाऱ्यांपैकी प्रत्येक व्यापाऱ्याला 2023-24 मध्ये सरासरी 1.20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये व्यवहार खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे.

4 लाख व्यापाऱ्यांचे सरासरी 28 लाखांचे नुकसान

सेबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पैसे गमावलेल्या व्यापाऱ्यांमध्ये 3.5 टक्के म्हणजे 4 लाख व्यापारी आहेत ज्यांचा प्रति व्यक्ती सरासरी तोटा 28 लाख रुपये आहे ज्यामध्ये व्यवहार खर्चाचाही समावेश आहे.

केवळ 1 टक्के गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये कमावले

सेबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या तीन आर्थिक वर्षांत फक्त 1 टक्के गुंतवणूकदार असे आहेत ज्यांनी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

याशिवाय, गुंतवणूकदारांची संख्या दोन वर्षांत जवळजवळ दुप्पट होऊन 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 96 लाख झाली, जी 2021-22 मध्ये सुमारे 51 लाख होती. अशा गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण व्यवसायात सुमारे 30 टक्के योगदान दिले.

SEBIने सांगितले की, चांगल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची उपलब्धता आणि कमी व्यवहार खर्चामुळे गुंतवणूकदारांना फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये व्यापार करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे बाजारात तरलता वाढली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.