एन्काऊंटरवर मुख्यमंत्री बोलत आहेत, हे संयुक्तिक नाही – सतेज पाटील
Marathi September 25, 2024 03:25 PM

बदलापूरमध्ये शाळेतील अल्पवयीन मुलींबाबतीत घडलेल्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या मताचे आम्ही सर्वजण आहोत; पण ज्या पद्धतीने एन्काऊंटरची घटना घडली आहे, त्यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

बदलापूरच्या घटनेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी तमाम जनतेची इच्छा होती. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत; पण मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळे बोलत आहेत, हे संयुक्तिक नाही. आपटेला वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता का, अशी शंका निर्माण होत आहे. शिवाय याप्रकरणी सरकारने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. त्यांनीदेखील आक्षेप घेतला आहे. आरोपीला चौकशीसाठी का आणण्यात आले होते, चार्जशीट फाइल झाली होती, मग पुन्हा तपासासाठी का आणण्यात आले? तपासाला आणायची वेळ संध्याकाळची का निवडण्यात आली होती, असे अनेक प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.

दरम्यान, आरोपीने पोलिसांवर गोळीबार करणे ही गृहखात्याची नामुष्की आहे. पण एन्काऊंटर झाले की लगेच काही वेळात डिजिटल बॅनर लागतात. वेगळ्या पद्धतीचे वातावरण होते. यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांवरून गृहखात्याची इमेज कशी होत आहे, हे सत्ताधाऱयांनी समजून घेण्याची गरज असल्याचा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर घटनेची चौकशी हा विषय नाही. नेमकी घटना काय घडली, हे समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणीही होत आहे. त्यावर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, खरंतर फडणवीस यांनी बदलापूर घटना, आंतरवाली सराटी घटना झाल्यावरच राजीनामा देणे अपेक्षित होते, असा टोला त्यांनी लगावला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.