अजित दादा महायुतीतून बाहेर पडतील अन् ते आमच्या महाशक्तीत येतील; आमदार बच्चू कडूंचा दावा, म्हणाले....
सुशांत सावंत September 25, 2024 07:13 PM

Bacchu Kadu मुंबई: महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यायलेल्या आणि राज्यातील जनतेची नस अचूक माहिती असणाऱ्या अनुभवी काकांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांची सध्या प्रचंड कोंडी झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्याने अजित पवार यांची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपल्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे काका शरद पवार (Sharad Pawar) यांनी उरलेल्या साथीदारांना सोबत घेऊन त्यांच्या पक्षाची मोट नव्याने आणि भक्कमपणे बांधायला सुरुवात केली आहे. अशा पडत्या काळात महायुतीमधील (Mahayuti) दोन साथीदार आपल्याला सांभाळून घेतील, ही अजित पवार यांची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे.

कारण, अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वीच बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटानेच (Shivsena Shinde Camp) चक्रव्यूह रचल्याची चर्चा असून अजितदादा या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील वृत्त नुकतेच प्रकाशित झाले आणि त्यानंतर अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहे.

अजित दादा आमच्यात येतील आणि महाशक्ती तयार होईल- बच्चू कडू 

दरम्यान, या विषयावर भाष्य करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील भाष्य केल्यानंतर. प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे जे बोलल्या ते सत्य असून त्या खरं तेच बोलल्या आहे. अजित दादा महायुतीत राहतील तर पंकजा मुंडे यांची जागा रिकामी होईल. किंबहुना आगामी काळात अजित दादा महायुतीतून बाहेर पडतील, असे भाकीत आमदार बच्चू कडू यांनी बोलताना व्यक्त केले आहे. सध्या अशी अनेक चिन्ह आहेत ज्यातून असे दिसून येतंय की अजित पवार महायुतीतून बाहेर येतील. किंबहुना ते आमच्यात येतील आणि महाशक्ती तयार होईल, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे.

निर्णय होतं नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहिल- बच्चू कडू

दरम्यान, दिव्यांग्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आज मुंबईच्या  मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी आमदार निवास ताब्यात घेत अपंगांच्या मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी  आमदार निवासाच्या  टेरेस पासून तर तळ मजल्यापर्यंतची जागा अपंगांनी ताब्यात घेतली. एकंदरीत या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आमच्या 3-4 बैठका मुख्यमंत्री यांच्या सोबत झाल्या. यावेळी घरकुल, पगारवाढ, दिव्यांग भवन, बोगस प्रमाणपत्रवर कारवाई या सगळ्या विषयांवर बैठका घेतल्या.

पण प्रशासनाने यात लक्षच घातलं नाही. काही मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत, पण पगार वाढीची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही. 3-3 महीन दिव्यांगांना पगार भेटत नाही. 5 तारखेच्या आत पगार देऊ असं, स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले होते, पण अजूनही त्याचे काही झालेले नाही. लाडक्या बहिणीला 1500 दिले,मात्र जे अडचणीत होते ते अधिक अडचणीत आहेत. जो पर्यंत निर्णय होतं नाही, तो पर्यंत आमचे आंदोलन सुरु राहिल, असा इशारा बच्चू कडूंनी यावेळी दिला आहे. 

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.