IND vs BAN : कानपूर कसोटीपूर्वीच वाढली धाकधूक, ‘त्या’ शक्यतेमुळे बीसीसीआयला फुटला घाम
GH News September 25, 2024 07:13 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकला असला तरी दुसऱ्या सामन्यातील विजयही तितकाच महत्त्वाचा आहे. शेवटचा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियम यासाठी सज्ज झालं आहे. तत्पूर्वी उत्तर प्रदेशच्या पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांनी एक स्टँड कमकुवत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सामन्याआधीच चिंतेत भर पडली आहे. कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा भार उचलू शकलेल अशी त्या स्टँडची परिस्थिती नाही, असं पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बाल्कनी सी धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. पीडब्ल्यूडीच्या इशाऱ्यानंतर बाल्कनी सीची तिकीट त्याच्या क्षमतेपेक्षा निम्मीच विकली जात आहेत. युपीसीए सीईओ अंकित चटर्जीने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, पीडब्ल्यूडीने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही या बाल्कनीची सर्व तिकीटं विकणार नाहीत. आम्ही त्या स्टँडमधील फक्त 1700 तिकीट विकण्याची परवानगी दिली आहे. या स्टँडची क्षमता 4800 प्रेक्षकांची आहे. इतकं काय तर बाल्कनी सीचं दुरूस्तीचं काम लवकरच हाती घेतलं जाणार आहे.

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या मते, जर स्टेडियममधील त्या भागात पूर्ण क्षमतेने प्रेक्षकवर्ग आला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. 24 सप्टेंबरला पीडब्ल्यूडीकडून काही अभियंत्यांनी स्टेडियममधील बाल्कनी सीची जवळपास 6 तास पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला याबाबतचं गांभीर्य सांगितलं. त्यांनी क्रिकेट असोसिएशनला सामन्यावेळी हा भाग बंद करण्यास सांगितलं आहे. जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पीडब्ल्यूडी अभियंताने सांगितलं की, जर ऋषभ पंतच्या षटकारावर लोकांनी उड्या मारल्या तर स्टँड 50 लोकांचं वजनही सांभाळू शकणार नाही. स्टेडियममधील हा भाग दुरुस्त करणं गरजेचं आहे.

कानपूर स्टेडियममध्ये भारताचे दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करणार यात शंका नाही. पीडब्ल्यूडीच्या इशाऱ्यानंतर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला ठोस असा निर्णय घ्यावा लागणार आहे. जर सामन्यात काही दुर्घटना झाली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.