उदंड जाहले, शिकलेले बेरोजगार
esakal September 29, 2024 06:45 AM

प्रा.विशाल गरड

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल पण हेच जळजळीत सत्य आहे. देशात सध्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट शिक्षण घेतलेल्या युवक युवतींची बेरोजगारी सर्वांत जास्त आहे. शाळा सोडलेले, नापास झालेले किंवा शाळेत हुशार नाहीत म्हणून घरच्यांनीच शेतात जुंपलेले काही ना काही काम करुन चार पैसे कामावत आहेत.

सध्या गावाकडे गड्याला सातशे आणि बायकांना पाचशे रुपये हजेरी आहे. याचा अर्थ गावाकडे अशिक्षित युवक आणि महिला आठवड्याला साडेतीन हजार ते पाच हजार रुपये कमावत आहेत. पण त्याच गावातील सुशिक्षित, उच्च शिक्षित फक्त नोकऱ्यांची वाट बघत संघर्ष करत आहेत. शिक्षणाने दिलेली लाज त्यांना छोटी मोठी कामे करू देत नाही म्हणूनच गावच्या कट्ट्यांवर अशा शिकलेल्या बेरोजगार युवकांच्या फौजा वाढताना दिसत आहेत.

शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठीच असते, या कल्पनेतून वयाची २१ ते २५ वर्ष ते शिकण्यासाठी घालवतात आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवल्यावरही पुढील चारपाच वर्ष नोकरी मिळवण्यासाठीच्या संघर्षात जातात. या दरम्यान शिक्षण घेणारे युवक वडिलांचा पिढीगत आलेला व्यवसाय शिकत नाहीत, शेतीकामे करत नाहीत कारण मुळात त्यांचे शिक्षणच नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने झालेले असते.

यातूनही मग जर अपयश आले, तर काही जण व्यवसायाची वाट धरतात, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेले भांडवल गुंतवून काहीतरी प्रकल्प उभा करतात पण जे काहीच करू इच्छित नाहीत, ते मात्र मोबाइलवर दीड जीबी डाटा संपवत स्थानिक राजकारणापासून आंतरराष्ट्रीय गोष्टींवर व्यक्त होत, घडण्याचा काळ बिघडवत राहतात.

वडिलांचे पैसे वापरून काहीतरी स्टार्टअप सुरू करून नंतर ते बासनात गुंडाळलेले. बँकांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करून पुन्हा तो बंद पाडलेले, शेतात जाऊन शेती करण्यात अपयशी ठरलेले अनेक युवक सध्या समाजात दिसतात याचे मुख्य कारण त्यांचा दृष्टिकोन आहे. कारण शिक्षण घेताना नोकरी हा एकमेव प्राधान्यक्रम ठेवल्याने बाकीच्या गोष्टींबद्दलचे प्राथमिक ज्ञान घेणेही त्यांना गरजेचे वाटले नाही.

नोकरीत अपयश आले म्हणून नाविलाजाने थेट व्यवसाय किंवा शेतीत उतरल्यावर दुसरे काय होणार ? किती युवक आहेत जे शिक्षणासोबत वडील करीत असलेल्या व्यवसायातही हातभार लावत होते ? शेतीच्या सर्व कामात त्यांना मदत करत होते ? उत्तर तुम्हाला माहीत आहे. भविष्यात पोराला शेती पिकवण्याच्या किंवा धंदा चालवण्याच्या कौशल्याची गरज पडली तर त्याला ते जमेल का ? याचा विचार मुलांच्या पालकांनी कधी केलाय का ?

इतरांचे सोडा मी माझेच उदाहरण देतो, मी शिक्षण घेत असताना माझ्या वडिलांनीही मला कधी शेतात राबवून घेतले नाही. आजही आमचे अण्णा, आबा आणि दादाच शेती बघतात. उद्या जर त्यांनी अचानक माझ्यावर शेती सोपवली, तर ती त्यांच्याएवढी सक्षम करू शकणार नाही हे वास्तव आहे. पण मला नोकरी मिळाली शिवाय तेवढ्यावर अवलंबून न राहता मी माझ्यातल्या कलागुणांना वाव दिला, नवनवीन कौशल्य विकसित केले म्हणून या स्पर्धेच्या युगात स्वतःचा उदरनिर्वाह करू शकलो.

प्रत्येक युवक-युवतीने फक्त नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आता कौशल्य विकसित करून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यायला हवा. प्लॅन बी तयार ठेवूनच करिअरची सुरुवात करावी. कारण आपण पावणेदोनशे करोड लोकसंख्येच्या देशात राहतोय, जिथे भविष्यात जागा, नोकरी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

पहिल्या मुली घरकाम शिकायच्या, सोबत शिक्षणही घ्यायच्या पण हल्ली मात्र काही महिला त्यांच्या मुलींना घरकामाला हातपण लावून देत नाहीत. त्या मुलींनाही वाटते की उद्या आपण नोकरीला लागलो की धुणेभांड्याला बाई लावू शकतो. घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रित सांभाळणे मुळात असतेच कठीण. त्यामुळे तशा महिलांना घरकामासाठी इतरांची मदत घेणे गैर नाही पण जर नोकरी नाही लागली आणि लग्नानंतर घरकाम करण्याची सवय नसेल, तर संसारातल्या कटकटी वाढत जातात. शरीराला श्रमाची सवय नसल्याने मन देखील ते करायला तयार होत नाही. समाजात कमावत्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही वेगळा आहे पण घरकाम करणाऱ्या स्त्रियांना अजूनही म्हणावी तशी प्रतिष्ठा समाज देऊ शकला नाही म्हणून भविष्यात घरकामांना बायका मिळणेही कठीण होऊन जाईल.

वर्क इंडियाच्या अहवालानुसार, ५७.६३ टक्के खासगी नोकऱ्यांना २० हजार रुपये किंवा त्याहून कमी पगार आहे. अशा परिस्थितीत या लोकांना किमान वेतनही दिले जात नाही. सुमारे २९.३४ टक्के खासगी नोकऱ्या या मध्यम उत्पन्न गटातील आहेत. यातील वेतन २० हजार ते ४० हजार रुपये प्रति महिना आहे. या वर्गात मोडणाऱ्यांच्या जीवनात थोडीफार सुधारणा होते. पण, त्यांना आरामदायी राहणीमान गाठता येत नाही. फक्त १०.७१ टक्के लोक ४० हजार ते ६० हजार रुपये प्रति महिना पगार मिळवू शकतात.

केवळ २.३१ टक्के खासगी नोकऱ्या लोकांना ६० हजार रुपयांपेक्षा जास्त कमावण्याची संधी देऊ शकतात. या आकडेवारीवरून सिद्ध होते, की आपल्या आयुष्यातली सुमारे २५ वर्ष म्हणजे ऊर्जावान कालावधी अशी नोकरी मिळवण्यासाठी घालवतो आणि आपल्याच वर्गातली नापास झालेली, शाळा सोडून दिलेली किंवा अडाणी पोरं मात्र कामाची कसलीही लाज न बाळगता काही ना काही करून महिन्याकाठी ५० हजार रुपये कमावतात.

सुशिक्षित मुलामुलींनो, गेल्या दहा-बारा वर्षांत अमृततुल्य चहा, बिर्याणी, वडापाव आणि मिसळ या चार व्यवसायांमध्ये द्रुतगतीने वाढ झाली आहे. इंजिनिअर चायवाला, एम.बी.ए वडापाववाला, पी.एच.डी भेळवाला अशा नावाने पदवीचे धिंडवडे काढून व्यवसायात उतरलेली उदाहरणेही ताजी आहेत. इथून पुढील काळात व्यवसायात सुद्धा प्रचंड स्पर्धा असणार आहे.

तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला चिकटलेल्या पदव्यांनी आलेली लाज थोडीशी बाजूला सारून कोणत्याही कामाला आणि कलेला कमी न समजता ते करत राहा, जपत राहा, रोजगाराच्या नवनवीन वाटा शोधत राहा. कारण विशिष्ट एका वयानंतर लोक किती शिकला हे विचारत नाहीत तर किती कमावतो हे विचारतात.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि

इतिहास व विविध सामाजिक

घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.