33 ठार… 195 जखमी, इस्रायलच्या हल्ल्यात लेबनान बेचिराख; भीतीपोटी लाखो लोकांनी काय केलं?
GH News September 29, 2024 01:09 PM

इस्रायलच्या हल्ल्यात लेबनान अक्षरश: बेचिराख झालं आहे. या हल्ल्यात लेबनानमध्ये 33 नागरीक ठार झाले आहेत. तर 195 नागरिक जखमी झाले आहेत. खुद्द लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानेच याची माहिती दिली आहे. लेबनानचे मंत्री नासिर यासीन यांनी ही माहिती दिली आहे. या हल्ल्यानंतर लेबनानच्या नागरिकांच्या मनात भीती बसली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यास सुरु केलं आहे. आपला संसार तसाच टाकून जीव वाचवण्यासाठी हे नागरिक जीव मुठीत घेऊन दुसरीकडे आश्रयाला जात आहेत. आतापर्यंत 10 लाख लेबनान नागरिकांनी स्थलांतर केलं आहे. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर हजारो नागरिकांनी आपला परिसर सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याचं नासीर यासीन यांनी म्हटलं आहे.

इस्रायलने लेबनानवर ज्या पद्धतीने बॉम्बचा वर्षाव केला आहे, त्यानंतर धास्तावलेल्या नागरिकांनी लेबनान सोडलं आहे. इस्रायलने शुक्रवारी रात्री उशिरा बेरूतमध्ये हिजबुल्लाहच्या हेडक्वॉर्टरवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह ठार झाला आहे. त्याचे अनेक कमांडरही मारले गेले आहेत. हिजबुल्लाहने शनिवारी नसरल्लाह मारल्या गेल्याच्या वृत्ताला दुजारो दिला आहे.

ऐतिहासिक टर्निंग पॉइंट

हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर लेबनानमध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नसरल्लाहचा मृत्यू हे मोठं यश असल्याचं मह्टलं आहे. नसरल्लाह याची हत्या हा एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत शक्ती संतुलन कायम राहणार आहे, असं सांगतानाच येत्या काळात मोठी आव्हाने असतील, असा सतर्कतेचा इशाराही नेतन्याहू यांनी दिला आहे.

काही मिनिटात खेळ खल्लास

नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर इस्रायली सेनेने महत्त्वाचं विधान केलं होतं. आम्हाला शत्रूंपर्यंत पोहोचायला अधिक वेळ लागणार नाही, असं इस्रायली सेनेने म्हटलं होतं. नसरल्लाह हा इस्रायलवर हल्ल्याचं प्लानिंग करत होता. तेव्हाच आयडीएफने त्याला टार्गेट करत थेट यमसदनी पाठवलं. नसरल्लाह त्यांच्या हेड क्वॉर्टरला येऊन काही मिनिटेच झाली होती. त्यावेळी इस्रायलने त्याला बंकर बस्टर बॉम्बने हल्ला करून ठार केलं होतं. या हल्ल्यात तो मारला गेला. नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर लेबनानमध्ये प्रचंड आक्रोश आहे. लेबनानने इस्रायलवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. तर, इस्रायलने लेबनानमध्ये बॉम्ब वर्षाव सुरू केला आहे.

पीडितांना न्याय मिळाला

हिजबुल्लाह प्रमुखाच्या मृत्यूनंतर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती बायडेन यांनी इस्रायलच्या सेल्फ डिफेन्सचं समर्थन केलं आहे. हसन अमेरिकन नागरिकांच्या हत्यांना जबाबदार होता. त्याने शेकडो अमेरिकन नागरिकांची हत्या केली होती. आता पीडितांना न्याय मिळाला आहे, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.