कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या इशान्येकडे, आज राज्यात या भागात मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'
abp majha web team September 29, 2024 01:13 PM

Rain alert: राज्यात परतीच्या पावसाचा जोर आता ओसरला असून कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या ईशान्येकडे आहे. परिणामी राज्यात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात सर्वदूर मुसळधार सरींच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर प्रदेश व आजूबाजूच्या भागात सक्रिय आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. 

आज विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला असून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

आज रविवारी (29 सप्टेंबर) विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा व नागपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर राज्यभरात चढलेला होता. आता हळूहळू कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 

मराठवाडा मध्य महाराष्ट्रात काय स्थिती? 

मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा कोणताही अलर्ट दिल देण्यात आला नसला तरी व मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर व कोकणातील सिंधुदुर्गात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

येत्या 24 तासात पुन्हा पाऊस? 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर सांगली तसेच कोकणातील सिंधुदुर्गात पुढील दोन दिवस वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज ही देण्यात आलाय. 

6 ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर 

परतीच्या पावसाचा जोर सध्या ओसरत असून ऑक्टोबर महिन्याच्या सहा तारखेपासून पुन्हा एकदा विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिके सहा ऑक्टोबर पर्यंत उरकून घेण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

ऑक्टोबर महिन्यात पावसाची स्थिती काय?

सहा ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून 13 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे 16 ऑक्टोबरनंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे खुळे म्हणाले.  

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 6 ऑक्टोबरपर्यंत कामं उरकून घ्या, पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.