'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
डॉ. कृष्णा केंडे September 30, 2024 11:13 AM

Marathwada Rain: एरवी टँकर वाडा, दुष्काळवाडा अशी ओळख असणाऱ्या मराठवाड्यावर यावर्षी आभाळमाया झाली आहे. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला असून मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहे. या तुलनेत आजवर ८०४ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे १२५ मि.मी. अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मात्र, पुढील काळात आणखी दमदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

मराठवाड्यात यंदा दमदार पावसाची हजेरी

मराठवाड्यात यंदा दमदार पावसाने हजेरी लावली असून सरासरीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यातील कोरडीठाक धरणेही तुडुंब झाली असून शेतकऱ्यांसह नागरिकांनाची तहानही यंदा भागणार आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतीसिंचनाला पाणी मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

मागील वर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं खरीपातील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. रखरखीत उन्हाळा त्यात धरणेही तळाशी गेल्यानं मराठवाड्याचा टँकरवाडा झाला होता. पिकांनी माना टाकल्या होत्या.  शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली  होती. पण यंदा ही सगळी दुष्काळझळ भरून निघाल्याचं चित्र मराठवाड्यात आहे. यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे.

आता अजून पाऊस झाला तर...

मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहे. या तुलनेत आजवर ८०४ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे १२५ मि.मी. अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील काळात आणखी दमदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस

छत्रपती संभाजीनगर : 131 टक्के
जालना : 134 टक्के
बीड : 136 टक्के
हिंगोली : 112 टक्के
परभणी : 108 टक्के
नांदेड : 107 टक्के
लातूर : 111 टक्के
धाराशिव : 120 टक्के

हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. मराठवाड्यात काही भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून 6ऑक्टोबरपर्यंत शेतीची कामी उरकून घेण्याचे आवाहन हवामान तज्ञांनी केले आहे. मराठवाड्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीचा आठवड्यात पावसाला पोषक स्थिती असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.