शाहरुखने केली करण जोहरची बोलती बंद, सर्वांसमोर स्टेजवरच धोनीबाबत सांगितलं की..
GH News September 30, 2024 05:14 PM

बॉलिवूडचा बादशाह म्हणून किंग खान शाहरूखची सर्वदूर छाप आहे. बॉलिवूडमध्ये त्याने आपल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करून दाखवलं आहे. त्याचा चाहतावर्गही फार मोठा आहे. त्याचा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला की सुपरडूपर हिट जाणार याची गॅरंटी प्रोड्युर्संना असते. त्यामुळे त्याच्या घराबाहेर चित्रपटात काम करावं यासाठी प्रोड्युसरच्या रांगा लागतात. शाहरूख खानने जवळपास तीन दशकं बॉलिवूडवर राज्य गाजवलं आहे. अजूनही त्याची भूरळ कायम आहे. असं असताना किंग शाहरूख खानचा आयफा अवॉर्ड समारंभातील एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत त्याच्यासोबत चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरही दिसत आहे. यावेळी करण जोहरने सर्वांसमोर शाहरूख खानला निवृत्तीबाबत प्रश्न विचारला. मग काय शाहरूख खान गप्प बसेल असं होईल का? सर्वांसमोर त्याने करण जोहरची बोलती बंद केली. यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा उल्लेख केला.

आयफा अवॉर्ड समारंभातील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहरूख खान आणि करण जोहर यांच्या हाती असावं असं दिसत आहे. यावेळी शाहरूख एक उदाहरण देताना म्हणाला की, ‘कधी थांबायचं, कधी निवृत्त व्हायचं हे दिग्गजांना माहिती असतं. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, फूटबॉलपटू सुनील छेत्री, टेनिसस्टार रॉजर फेडरर या सर्वांना निवृत्ती कधी घ्यायची ते माहिती होते. आता वेळ तुमची आहे. कृपया जा.’ असं बोलून शाहरूख खानने करण जोहरला स्टेजवरून जाण्यास सांगितलं. मग काय त्यानेही कॉफी विथ करणच्या भात्यातला प्रश्न काढला.

करण जोहर म्हणाला की, ‘जर असं असेल तर मग तू का निवृत्ती घेत नाहीस?’ या प्रश्नावर शाहरूख खानने प्रत्युत्तर देत महेंद्रसिंह धोनीचं उदाहरण दिलं. ‘खरं तर मी दुसऱ्या प्रकारच्या दिग्गजांमध्ये बसतो. धोनी आणि मी या प्रकारात मोडतो. नकार देऊनही 10 वेळा आयपीएल खेळतो.’, असं शाहरूख खान म्हणाला. त्याच्या उत्तरानंतर प्रेक्षकवर्गात बसलेल्या विकी कौशलने सांगितलं की, ‘निवृत्ती ही दिग्गजांसाठी असते, खेळ कायमचा असतो.’

शाहरूख खानला आयफा अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. जवान चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला  गौरविण्यात आले. त्याचबरोबर ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, ॲनिमल हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात अनिल कपूरची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी शबाना आझमीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.