राहुल गांधी 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर
Marathi September 30, 2024 11:24 PM

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.

राहुल गांधी शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात येत असून त्या दिवशी त्यांचा मुक्काम असेल. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. या अनावरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. 5 ऑक्टोबरला सायंकाळी कसबा बावड पॅव्हेलियन मैदानावर 2001 कलाकार नाटय सादर करणार आहेत, यामध्ये 1 हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मध्यमातून केला जाणार आहे असे पाटील यांनी सांगितले.

5 ऑक्टोबर रोजी सकाळी राहुल गांधी हे राजर्षी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर कोल्हापुरात होत असलेल्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात १ हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्व धर्मीय लोक तसेच विविध NGO च्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. राहुल गांधी या सर्वांशी संवाद साधणार आहेत. या संमेलनासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस पक्ष ‘हाउस फुल्ल!’’

राज्यातील मोठे नेते कोल्हापुरात असल्याने काँग्रेस मध्ये इनकमिंग होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर कॉग्रेस भरगच्च आहे, ऑलरेडी हाउसफुल आहे. मात्र येणाऱ्यांचे स्वागतच असेल असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये सर्वाना न्याय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या पत्रकार परिषदेला खासदार शाहू महाराज, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, करणसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.