मल्याळी डर्टी सिनेमा
कोची : मल्याळी सिनेसृष्टीतील महिला अत्याचाराच्या मुद्यावरून ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांनी आज प्रथमच मौन सोडले आहे. चुकीचे कृत्य करणाऱ्यांविरोधात पुरावे असतील तर कठोर कारवाई केली जावी असे त्यांनी म्हटले आहे. सिनेसृष्टीतील कोणत्याही शक्ती समुहाचा (पॉवर ग्रुप) मी घटक नाही. राज्य सरकारने हेमा समितीचा अहवाल जाहीर करून योग्य निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मध्यंतरी अनेक महिला कलाकारांकडून काही अभिनेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर मोहनलाल यांच्यासमवेत मल्याळी चित्रपट संघटनेच्या (अम्मा) अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. त्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त मत मांडले. दुसरीकडे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनीही चित्रपटाच्या सेटवर आणि कॅराव्हॅनमध्ये अभिनेत्रींचे छुप्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात असल्याचा आरोप केल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे. हे रेकॉर्ड करण्यात आलेले व्हिडिओ नंतर अनेकांच्या मोबाईलमध्ये पोचल्याचे दिसून आले. ही मंडळी ते व्हिडिओ पाहत असल्याचे दृश्य मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसा विलंबच झाला
‘‘ न्या. हेमा समितीचा अहवाल जाहीर होण्यास तसे पाहता विलंबच झाला आहे. महिलांचे शोषण हे केवळ मल्याळी सिनेसृष्टीमध्येच होते असे नाही तर अन्य प्रादेशिक चित्रपटसृष्टीमध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. मल्याळी सिनेसृष्टीमध्ये कॅराव्हॅनमध्ये छुप्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अनेक नट्यांचे चित्रीकरण केले जाते आणि नंतर तेच व्हिडिओ ग्रुपमध्ये व्हायरल केले जातात. आज महिला अभिनेत्रींवर वेळ आली आहे त्यामुळे पुरुष कलाकारांनी पुढाकार घेऊन या प्रकरणाला वाचा फोडायला हवी,’’ असेही राधिका यांनी म्हटले आहे.
सिनेसृष्टी आता सर्वांत मोठे अंडरवर्ल्ड बनत चालले आहे. या क्रौर्याची कल्पना देखील करवत नाही. हे सर्वकाही आमच्या कल्पनेपलिकडचे आहे.
- राधिका सरथकुमार, अभिनेत्री
चित्रपट मंडळ हे सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. हे प्रश्न सर्वांनीच विचारायला हवेत. या चित्रपट उद्योगामध्ये अनेक मेहनती लोक आहेत. प्रत्येकावरच आपल्याला आरोप करता येणार नाही. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शिक्षा करण्यात येईल.
- मोहनलाल, अभिनेते