नायर रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, डीनच्या बदलीसह विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश
अभिषेक मुठाळ October 01, 2024 05:13 PM

Nair Hospital मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित आणि मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय (Nair Hospital) व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक छळ (Sexual Harassment Case) केल्याचा प्रकार घडला होता. रुग्णालयात कार्यरत असलेल्या सहयोगी प्राध्यापकानेच हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले होते. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याचे राजकारणही तापले असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सोबतच पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्रीही त्यांनी दिली आहे.

डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिली आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. 

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांची बदली

नायर  रुग्णालयातील लैंगिक छळवणूक  प्रकरणात विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून  नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांची नायर रुग्णालयातून बदली करण्यात आली आहे. डॉ. सुधीर मेढेकर हे आता कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहतील. तर कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली आहे. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक  प्रकरणात केलेल्या मुख्यमंत्र्यांकडे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता  यांच्यावर कारवाई करण्याच्या  मागणीनंतर  आता या नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर  यांच्या बदलीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती'

या लैंगिक छळ तक्रार प्रकरणात अतिरिक्त तक्रारी प्राप्त झाल्या असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी ही महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील 'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती' यांचेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे, जेणेकरून या घटनेची आणि तक्रारीची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करता येईल. चौकशीमध्ये आढळलेले प्राथमिक तथ्य आणि घडल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता, या तक्रारीनुसार आरोपी असलेल्या सहयोगी प्राध्यापकाचे प्रशासनाने निलंबन केले आहे. मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Pune Crime : मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.