पुण्यात उद्यापासून फाऊन्टन पेन शो
esakal October 03, 2024 03:45 AM

पुणे, ता. २ : तेरा हून अधिक देशांतील ५५ पेक्षा अधिक नामवंत कंपन्यांचे पेन ‘द पुणे फाऊन्टन पेन शो २०२४’ या प्रदर्शनात पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. हे प्रदर्शन येत्या ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वन प्लेस येथे सकाळी दहा ते रात्री साडेआठ यावेळेत आयोजित केले आहे. प्रदर्शनात भारतीय कंपन्यांची नवनवीन आकर्षक पेन व खास विद्यार्थ्यांसाठी फाऊन्टन पेनांचे विविध प्रकार पाहण्यास व विक्रीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय कॅलिग्राफी पेन, व्हिन्टेज पेन, शंभर हून अधिक विविध रंगांच्या इंक बॉटल, प्रिमिअम बुक, पेन स्टोअरेज केसेस तसेच थ्रीडी प्रिंटिंग मशिनद्वारे कस्टमाइज पेन बनवून घेता येणार आहे. प्रदर्शन विनामूल्य खुले असेल. तसेच या प्रदर्शनामध्ये ‘राष्ट्रीय प्रतिज्ञा’ याविषयावर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना स्पर्धेत सहभागी होता येणार असून मराठी, हिंदी व इंग्रजी यातील एका भाषेतून लिहिता येईल. हे लेखन ए फोर पानावर फक्त शाई पेनाने (फाऊन्टन पेनाने) लिहून स्पर्धेच्या ठिकाणी आणून द्यायचे आहे, असे आवाहन प्रदर्शनाचे आयोजक रश्मी नगरकर पिल्ले यांनी केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.