मोठी बातमी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
सोमेश कोलगे October 03, 2024 11:43 PM

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील ही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत आज (दि. 3) चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. 

कॅबिनेटच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट 

ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

नितीन गडकरी काय काय म्हणाले?

नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. 

मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.