इराणी चषकातील द्विशतकानंतर सरफराज खानची सूचक पोस्ट, कोणावर साधला निशाणा?
Marathi October 04, 2024 03:24 AM

यावेळी इराणी चषकामध्ये मुंबई आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’चे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चुरशीची स्पर्धा रंगली आहे. या सामन्यात उजव्या हाताचा स्फोटक फलंदाज सरफारज खान मुंबईचं प्रतिनिधित्व करतोय, ज्यानं आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली. सरफराजनं या सामन्यात नाबाद 222 धावा केल्या. या खेळीनंतर त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यानं एक सूचक कॅप्शन लिहिलं आहे.

येथे नमूद करण्यासारखं म्हणजे, सरफराज खानला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. तो 15 सदस्यीय संघात होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसानंतर सरफराजला इराणी चषकात सहभागी होण्यासाठी टीम इंडियातून मुक्त करण्यात आलं.

यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुलच्या अनुपस्थितीत सरफराजला संधी मिळाली होती. या संधीचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला होता. मात्र बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत राहुल पुन्हा भारतीय संघात परतला, ज्यामुळे सरफराजला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकलं नाही. तो बहुधा संघातून वगळण्यात आल्यामुळे निराश झाला होता.

गुरुवारी (3 ऑक्टोबर) या मधल्या फळीतील फलंदाजानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. आपल्या या पोस्टमध्ये त्यानं इराणी चषकात द्विशतक झळकावल्यानंतरची छायाचित्रं टाकली आहेत. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, “जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत संघर्ष आहे. लढत राहणं हे माझे काम आहे, 222*.” मात्र काही काळानंतर त्यानं ही पोस्ट एडिट करून फक्त 222 असं ठेवलं आहे.

सरफराजच्या या कॅप्शनला चाहते रोहित शर्मा आणि गौतम गंभीरसोबत जोडत आहेत. सरफराजनं संघ व्यवस्थापनाला बॅटनं प्रत्युत्तर दिल्याचं चाहत्याचं मत आहे. त्यामुळे आता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळते की त्याच्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्या जातं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा –

“हार्दिक पांड्या 18 कोटी रुपयांचा खेळाडू नाही”, माजी मुख्य प्रशिक्षकाचं धक्कादायक वक्तव्य
टी20 विश्वचषकात हिजाब घालून उतरली खेळाडू, पाकिस्तानशी आहे खास संबंध
बाबर आझमनं पाकिस्तानचं कर्णधारपद का सोडलं? कोच कर्स्टन यांच्या अहवालात मोठा खुलासा


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.