ढिंग टांग : मातुराम की जलेबियां...!
esakal October 04, 2024 10:45 AM

बेटा : (अतिशय उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (पक्षाच्या कामकाजात व्यग्र…) हं!

बेटा : (किंचित हिरमुसत) कमॉन, मी जातो तिथं माझं एवढं जोरात स्वागत केलं जातं! पण घरात हे असं?

मम्मामॅडम : (तंद्री मोडल्यानंतर कागदपत्रं दूर ठेवत) आलास? तुझ्यासाठी मी खास पास्ता केला आहे! तू पटकन आधी-

बेटा : मी आंघोळ करुन आलो आहे! आणि आय डोण्ट वाँट पास्ता!

मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) भूक नाही का तुला? काही तरी खायलाच हवं! निवडणुकांचे दिवस आहेत! बाहेरचं काही खाऊ नये! बाधेल!!

बेटा : (हातातला पुडा पुढे करत) पास्ता को मारो गोली! हे घे!! अफलातून चीज आहे!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) इश्श! चीज कशाला आणलंस? घरात आहे की भरपूर!!

बेटा : (आता कपाळाला हात लावण्याची पाळी यांची!) मम्मा, ही एक मस्त चीज आहे, खाऊन बघ!

मम्मामॅडम : (उत्सुकतेनं पुडा घेत) काय आणलंयस?

बेटा : सोनीपत गोहाना की मशहूर लाला मातुराम हलवाई की जलेबियां!! एक बार खाओ, बार बार आओ!! मी तरी माझ्या आख्ख्या आयुष्यात इतकी भारी जिलबी खाल्लेली नाही!

मम्मामॅडम : जलेबी? माय गॉड, केवढी शुगर असते त्यात!!

बेटा : (जलेबीपुराणात मग्न...) मी आपल्या दिदीसाठी एक पॅक बांधून घेतला! तिला ताबडतोब मेसेज करुन टाकला की ऐसी जलेबी मैंने आजतक नही खाई! तुम्हारे लिए मैं दो-चार किलो बांध कर ला रहा हूं!!

मम्मामॅडम : (समाधानानं) कित्ती ते प्रेम! काही झालं तरी ओरिजिनल लाडकी बहीण आहे ती!!

बेटा : (सपशेल दुर्लक्ष करत) जिलेबीचा दुसरा पुडा तुझ्यासाठी आणला! पाव किलोची एकेक जिलेबी आहे! जिलेबी कसली? जिलेबा आहे, जिलेबा! हाहा!!

मम्मामॅडम : (चिंताग्रस्त होत्साती) कुठे कुठे काय काय खाऊन येतोस! आऊटसाइड फूड इज नॉट अलाऊड हिअर!! मागल्या खेपेला गुजरातेत गेला होतास, तिथं भजी खाऊन आलास! वायनाडला गेलास की कायम डोसे खाऊन यायचास! महाराष्ट्रात गेल्यावर…

बेटा : (गंभीरपणाने) महाराष्ट्रात जायची मी वाट पाहातोच आहे! विशेषत: पुण्यातल्या मंगल कार्यालयांना ही जिलेबी दाखवणार आहे! बघू दे, त्यांनाही खरी जिलेबी कशी असते ती! एकेक इंचाच्या जिलेब्या देतात! हॅ:!!

मम्मामॅडम : (अंगावर शहारा येत) एवढं गोड खाऊ नये! पण त्या आधी मला मातुरामच्या जिलेब्या कुणाकुणाला पाठवाव्यात हे ठरवायचंय!

मम्मामॅडम : (हिशेबीपणाने) एकेक जिलेबी पाठव! पाव किलोची एक आहे म्हणालास ना तू? एकेक तुकडा पुष्कळ झाला!!

बेटा : (खवय्येगिरीचा नमूना पेश करत) कमॉन, मी तीन खाल्ल्या! हरयाणातले लोक आठ-दहा आरामात उडवतात!! लाला मातुराम का जबाब नही! व्वा!! त्यांच्या दुकानात रबडी, गुलाबजामुन, हलुवा असे बरेच पदार्थ मिळतात! हीऽऽ गर्दी असते, पण मला त्यांनी ओळखलं, आणि पटकन जिलेब्या बांधून दिल्या! म्हणाला, ‘ये हमारी भी मुहब्बत की दुकान है!’’ हाहा!!

मम्मामॅडम : (गंभीर सुरात) त्या नतद्रष्टांच्या राजवटीत आज लोकांना रोटी खायला मिळत नाही, अशा परिस्थितीत जिलब्या खात हिंडणं शोभत नाही हो आपल्याला!!

बेटा : (मनोमन पटून) खरंय, मम्मा! मी उद्याच एखाद्या ढाब्यावर जाऊन डालरोटी खाऊन येतो! मग आपल्याला मतांच्या जिलेब्या मिळतील…हो ना?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.