Nashik Crime : शहर पोलिसांना सोनसाखळी चोरट्यांचे आव्हान; आठवड्यात 6 घटनांमध्ये महिलांचे सौभाग्याचे लेणे ओरबाडले
esakal October 04, 2024 10:45 AM

नाशिक : नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असला तरी, त्यापूर्वीच सोनसाखळी चोरट्यांनी शहर पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. गेल्या आठवडाभरात सोनसाखळी चोरट्यांनी शहरात वेगवेगळ्या परिसरात पाच ठिकाणी महिलांचे सौभाग्याचे लेणे बळजबरीने ओरबाढून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. पाचही घटनांमध्ये भामट्यांनी महिलांना त्याच्या घराजवळच पायी जात असताना लक्ष्य केले आहे. त्यामुळे महिलांना आता घराबाहेर पडण्याची भिती वाटू लागली आहे. (challenge of gold chain thieves to city police has scratched fortunes of women in 6 incidents in week )

यातील एकाही गुन्ह्याची उकल पोलिसांना करता न आल्याने नवरात्रोत्सवात सोनसाखळी ओरबाडून नेण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकरोड परिसरातील मुक्तीधाम मैदानाच्या पाठीमागे राहत्या घरापासून पायी जाणार्या विवाहितेची सोन्याचे मंगळसूत्र मोपेडवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेली. दिया सोनलाला मेडतीया (रा. पूज्यसीताई सोसायटी, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. १) रात्री साडेनऊच्या सुमारास त्या आनंदनगरमधील श्री गणेश प्राईड बिल्डिंगसमोरून पायी जात होत्या.

त्यावेळी काळ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने विवाहितेच्या गळ्यातील ५० हजारांचे २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून इगल सपोर्ट मैदानाच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक उपनिरीक्षक शेजवळ तपास करीत आहेत. तर, शिवाजीनगर येथील ध्रुवनगरमध्ये घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्याने खिडकीतून खेचून नेल्याचा प्रकार घडला.

साधना सोनू तांदळे (रा. अशोक स्वप्नशिल्प रो हाऊस, ध्रुवनगर, शिवाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, सदरची घटना सोमवारी (ता.३०) पहाटे तीनच्या सुमारास घडली. त्यांची आत्येसासू बालिका माने या घराच्या खिडकीजवळ झोपलेल्या असताना अज्ञात संशयिताने खिडकी उघडून त्यांच्या गळ्यातील १५ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून पोबारा केला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी चोरीचा दाखल आहे.

म्हसरुळ ‘हॉटस्पॉट’

आठवडाभरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेल्याच्या सहा घटना घडल्या असून, ४ लाख १८ हजारांचा ऐवज सोनसाखळी चोरट्यांनी नेला आहे. सोनसाखळी खेचून नेण्याचे प्रमाण म्हसरुळ हद्दीत अधिक आहे. या आठवड्यात सलग दोन दिवसात दोन घटना घडल्या. तर, इंदिरानगरमध्ये एकाच दिवशी अवघ्या १५ मिनिटात दोन महिलांना सोनसाखळी चोरट्यांनी लक्ष्य केले होते. उपनगर हद्दीतही आठवड्यात दोन घटना घडल्या आहेत.

पोलीस ठाणे.... तारीख.... गेला ऐवज

म्हसरुळ .... २९ सप्टें...... ६० हजार रु.

म्हसरुळ ..... ३० सप्टें..... १ लाख रु.

इंदिरानगर .... २८ सप्टें..... ८० हजार रु.

इंदिरानगर .... २८ सप्टें..... ६४ हजार रु.

उपनगर.... २३ सप्टें.... ६४ हजार रु.

उपनगर .... १ ऑक्टो..... ५० हजार रु.

एकूण ............४ लाख १८ हजार रुपये.

''चैनस्नॅचिंग गुन्ह्याचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासले जात आहेत. संशयित चोरट्यांचा माग काढला जात असून लवकर गुन्ह्यांची उकल होईल. महिलांनीही सार्वजनिक ठिकाणी जाताना मौल्यवान दागिने परिधान करणे टाळावे.''- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.