IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या डेब्यू सामन्यातच मयंक यादवचा विक्रम, नोंदवला असा रेकॉर्ड
GH News October 07, 2024 12:08 AM

बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज मयंक यादवने पदार्पण केलं. आयपीएलमध्ये त्याने आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं होतं. त्याच्या गोलंदाजीचा वेग आणि अचूक टप्पा पाहून त्यातील धमक अधोरेखित झाली होती. मात्र आयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकला होता. मात्र आता मयंक यादव फिट अँड फाईन असून बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली. कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्याकडे संघाचं सहावं आणि त्याचं वैयक्तिक पहिलं षटक सोपवलं. या षटकातील पहिलाच चेंडू मयंक यादवने 141 किमी प्रतितास वेगाने टाकला. त्यामुळे तोहिद हृदोयला त्याची चेंडू खेळताना अडचण जाणवली. दुसऱ्या चेंडूचा वेग 145 किमी प्रतितास इतका होता. तिसरा चेंडू 137 किमी प्रतितासाने, तर चौथा चेंडू 147 किमी प्रतितासाने टाकला. त्याचबरोबर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवरही गती कायम ठेवली आणि एकही धाव दिली नाही. भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या सामन्यात निर्धाव षटक टाकणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

2006 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळताना अजित अगरकरने पहिल्याच सामन्यात पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं. त्यानंतर हा विक्रम अर्शदीप सिंगच्या नावावर नोंदवला गेला. त्याने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात साउथॅप्टनमध्ये निर्धाव षटक टाकलं होतं. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मयंक यादवने ग्वाल्हेरमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच निर्धाव षटक टाकलं होतं. त्याचबरोबर दुसऱ्या षटकात विकेट घेण्यात यश मिळवलं. महमुद्दुल्लाहची विकेट घेत आंतरराष्ट्रीय कारकिर्दिला सुरुवात केली आहे.

मयंक यादवने पहिल्याच सामन्यात 4 षटकं टाकली. त्यातलं एक षटक निर्धाव होतं. तर 21 धावा देत 1 गडी बाद केला. तसेच त्याचा इकोनॉमी रेट हा 5.20 इतका होता. मयंक यादवच्या गोलंदाजीचं कौतुक होत आहे. दरम्यान, बांगलादेशने 19.5 षटकात 10 गडी गमवून 127 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं आहे. आता भारत हे आव्हान किती षटकात पूर्ण करणार याकडे लक्ष लागून आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने 3, वरुण चक्रवर्थीने 3, तर हार्दिक पांड्या-मयंक अग्रवाल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक गडी बाद केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.