Zaheer Khan : सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये डिमोशन… नेहरा, आरपीचं कॉम्पिटिशन… जहीरनं कसं केलं होतं कमबॅक?
Mensxp October 07, 2024 05:45 PM

Zaheer Khan Comeback Story : भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून जहीर खानची ओळख आहे. त्याने भारताला २०११ चा वर्ल्डकप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तसेच टीम इंडियाचा तोफखाना कायम कसा धडाडत राहील याची देखील सोय केली. 


भारतीय संघात २००० मध्ये स्थान मिळणाऱ्या जहीर खानचा प्रवास चढ उतारांनी भरलेला आहे. पदार्पणानंतर जहीरनं आपला वेग, नियंत्रण आणि आक्रमकता याच्या जोरावर आपलं नाव कमावल. आयसीसी नॉक आऊट ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात त्यानं आपल्या यॉर्करने स्टीव्ह वॉचा त्रिफळा उडवला. त्यानंतर जहीरचा टीम इंडियातील खुट्टा बळकट झाला. 


२००३ चा वर्ल्डकप गाजवला

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखील खेळणाऱ्या भारतीय संघाने २००३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. या वर्ल्डकपमध्ये जहीर खानने दमदार कामगिरी केली होती. जागतिक क्रिकेटमध्ये जहीर खान हा उगवता तारा होता. तो २००३ च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर होता. त्याने १८ विकेट्स घेत भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहचवण्यात मोलाचे योगदान दिलं. 


जहीर खान त्यावेळी जवागल श्रीनाथ आणि आशिष नेहरा यांच्या साथीने टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळत होता. भारताला एक उमदा वेगवान गोलंदाज मिळाला होता. 

हेही वाचा : तुंबाडचे शूटिंग कुठे होते? चित्रपटात दाखवलेल्या बंगल्याचे लोकेशन काय आहे?


दुखापतींनी त्रस्त अन् करारात डिमोशन  

Instagram

मात्र जहीरच्या कारकीर्दीला दुखापतींच ग्रहण लागलं. २००३ च्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जहीर खानला दुखापत झाली आणि त्याला महत्वाच्या सामन्यात बेंचवर बसावं लागलं. एकीकडे जहीर खान दुखापतीमुळं संघात आत बाहेर करत होता. दुसरीकडं एस. श्रीसंत आणि आर. पी. सिंह यासारखे युवा गोलंदाज जहीरची जागा घेण्यासाठी सज्ज होत होते. 


त्यात जहीर खानचं बीसीसीआयच्या केंद्रीय करारात डिमोशन झालं. त्याला क श्रेणीत टाकण्यात आलं. मात्र जहीर खान खचून गेला नाही. त्यानं याही परिस्थितीवर झुंजारपणे मात केली. 

  हेही वाचा :   Hardik Pandya : घटस्फोटाच्या 2 महिन्यांनंतर हार्दिकने नताशा आणि मुलांची भेट घेतली, दोघांची प्रतिक्रिया पाहा व्हिडिओमध्ये


वॉर्सेस्टरशायर अन् काऊंटी 

Instagram

जहीर खानने बॅक टू बेसिक जात आपला फॉर्म परत मिळवला. जहीर खानने २००६ मध्ये काऊंटी खेळण्याचा निर्णय घेतला. तो वॉर्सेस्टरशायरकडून काऊंटी खेळू लागला. त्या हंगामात त्यानं तब्बल ७८ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्यानं आपल्या गोलंदाजीच्या शैलीत अन् अॅक्शनमध्ये काही बदल केले. त्यानं आपला रन अप शॉर्ट केला.


याचा फायदा त्याला चांगली स्विंग गोलंदाजी करण्यात झाला. त्याच्या या दर्जेदार स्विंग गोलंदाजीमुळे त्याचे वॉर्सेस्टरशायरचे त्याचे संघ सहकारी त्याला झिपी झॅकी अशा टोपण नावानं बोलवू लागले. ज्यावेळी त्यानं भारतीय संघात पुनरागमन केलं त्यावेळी तो भारताचा युवा गोलंदाज राहिला नव्हता. आता त्यानं भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. 

हेही वाचा :   Close Grip Lat Pulldown Workout : व्यायाम करण्याचा योग्य मार्ग, प्रकार, फायदे आणि चुका


२००७ टर्निंग पॉईंट 

जहीर खान भारतीय संघात परतल्यानंतर २००७ मध्ये ट्रेंड ब्रिज कसोटत त्यानं भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तो आता भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी विभागचं नेतृत्व करू लागला होता. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केलाच. त्याचबरोबर त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील आपल्या नियंत्रित गोलंदाजी आणि दोन्ही बाजूला स्विंग करण्याच्या क्षमतेनं अधिराज्य गाजवायला सुरूवात केली. 


२०११ चा वर्ल्डकप 

२०११ च्या वर्ल्डकपमध्ये जहीर खानने कहर केला. हा वर्ल्डकप इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये होत होता. या कॉन्टिनेंटमध्ये फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो. मात्र जहीर खान एका वेगळ्याच तयारीत होता. त्यानं आपलं नकल बॉलचं अस्त्र बाहेर काढलं. भारतातील संथ खेळपट्यांवर हे अस्त्र प्रभावी ठरलं. 

जहीर खानने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये तब्बल २१ विकेट्स घेतल्या. त्यानं नकल बॉलवर इयान बेल, पॉल कॉलिंगवूड, मायकल हसी अशा अनेक दिग्गजांना गार केलं. तो वर्ल्डकपमधील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला. भारताच्या ऐतिहासिक वर्ल्डकप विजयात त्याचा वाटा सिंहाचा होता. 


जहीर खानने समृद्ध वारसा मागे सोडला 

जहीर खानने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र तोपर्यंत त्यानं ९२ कसोटीत ३११ विकेट्स घेतल्या होत्या. तर २०० वनडे सामन्यात २८२ विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर टी २० क्रिकेटमध्ये १७ सामन्यात १७ विकेट्स आहेत. त्यानं फक्त भारतीय क्रिकेटची आपल्या गोलंदाजीने सेवा केली नाही तर त्यानं टीम इंडियाची वेगवान गोलंदाजीची दुसरी फळी देखील तयार करण्यात मदत केली. जहीर खानने तयार केलेला वारसा हा आताची वेगवान गोलंदाजींची फळी पुढे नेताना दिसत आहे.


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.