वाकड-हिंजवडीकरांची हिराई सीताई देवी
esakal October 07, 2024 09:45 PM

हिंजवडी, ता. ७ : म्हातोबा देवाबरोबरच हिंजवडी येथे मुळा नदीच्या काठावरील हिराई-सीताई देवींचे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हिंजवडी-वाकड या दोन्ही गावाच्या वेशीवर हे मंदिर वसले आहे. या मंदिरात ‘साती आसरा’चे सात तांदळे आहेत. दरवर्षी नवरात्रोत्सवात आणि म्हातोबा उत्सव काळात शेकडो भाविक देवींचा मानपान करणे तसेच ओटी भरण्यासाठी आवर्जून येतात.
मंदिरात घटस्थापना होते. नऊ दिवस नवनाथ ग्रंथाचे पारायण केले जाते. जांभुळकर कुटुंबीय त्याचे वाचन करतात. दररोज रात्री आठ वाजता आरती होते, सुमारे हजार भाविकांना महाप्रसाद दिला जातो. रात्री दहा ते एकपर्यंत देवीचा जागर होतो. पहाटे पाच ते सात यावेळेते दुर्गा शप्तसतीचे वाचन महिला भाविक करतात. जांभुळकर, साखरे, बेंद्रे, बलकवडे, हुलावळे, भुजबळ, कळमकर, सायकर, कलाटे, देवकर, वाकडकर, पारखी या परिवारातील प्रतिनिधी पहिल्यापासून आजपर्यंत मंदिरात नऊ दिवस मुक्कामाला असतो. सातव्या माळेला वाकड-हिंजवडीतील सुमारे दीड हजार सुवासिनी एकत्र येऊन उपवासाचा प्रसाद बनवितात. हिंजवडी-वाकडमधील परगावी दिलेल्या महेरवाशीन सुवासिनी देवीचा मानपान आणि ओटी भरण्यासाठी येतात.
अष्टमीला होम आणि नवमीला होमाची पूर्णाहुती होते. नवमी किंवा दशमीला घट उठतात. दसऱ्याला नऊ कुमार मुले व नऊ कुमारिकांना जेवण दिले जाते. मग, महाप्रसाद होतो. कोजागिरी पौर्णिमेला देवीला दुधाचा नैवेद्य दाखवून जागर केला जातो. खेड तालुक्यातील चासकमानला देखील ‘हिराई-सीताई’ देवींचे मंदिर आहे. देवाने माणसाचे रुप घेऊन तेथील स्थानिक ग्रामस्थांना हिंजवडी येथे लुप्त झालेल्या ‘साती आसरा’बद्दल सांगितल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे, चासकमान भागातील भाविक येथे दरवर्षी उत्सवात येऊन देवींचा मानपान करून जातात. तेथील घरात लग्नकार्य असेल तर नवविवाहित जोडपे इथे देवींच्या पाया पडायला आवर्जून येतात. गणेश पारखी, संतोष पारखी, अमोल पारखी, अनिल भुजबळ, दीपक कळमकर आदी नवरात्रीतील पूजा व्यवस्थापन पाहतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.