तासगाव नगरपरिषदेच्या नूतन वास्तूमधून गोरगरीबांना आधार देण्याचे काम व्हावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
Inshorts Marathi October 08, 2024 05:45 AM

सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : अत्यंत देखणी, सुंदर व तासगाव शहराचे वैभव वाढवणारी तासगाव नगरपरिषदेची वास्तू निर्माण झाली आहे. या वास्तुमधून गोरगरीबांची कामे वेळेत होवून त्यांना आधार वाटावा असे काम प्रशासनाने करावे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार संजय पाटील, तहसिलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील, नगरअभियंता आनंद औताडे, प्रभाकर पाटील, राजाराम गरूड यांच्यासह नगरपालिकेचे आजी, माजी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सुमारे 13 कोटी 50 लाख रूपये खर्चून ही सुंदर वास्तु निर्माण झाली आहे. गत दोन वर्षात या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 5 कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला. या इमारतीमध्ये तासगावचा इतिहास रेखाटलेला आहे. इमारतीची रचना व झालेले काम हे कौतुकास्पद आहे. सर्वांनी एकत्रित येवून गावचा व शहराचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना नगरपरिषदेची एक चांगली वास्तु निर्माण झाली असून नागरिकांसाठी चांगली सेवा देण्याचे काम प्रशासन करेल, शॉपिंग सेंटर आदीच्या माध्यमातून नगरपालिकेचे उत्पन्न वाढले तर कर कमी करण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.

प्रारंभी मान्यवरांनी उद्घाटनानंतर इमारतीची पाहणी केली व झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी वास्तुविशारद प्रमोद पारीख, फर्निचर कामाच्या रचनाकार कल्याणी सावंत, भालचंद्र सावंत, इमारतीचे कंत्राटदार चेतन चव्हाण, फर्निचर कंत्राटदार विवेक जमखंडे, विद्युत कंत्राटदार अजित सुर्यवंशी यांचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी वैशिष्टपूर्ण योजनेतून 11 कोटी व नगरपालिका विकास शुल्कातून 2 कोटी 50 लाख रूपये खर्चून ही इमारत बांधण्यात आल्याचे सांगितले. या जागेचे क्षेत्रफळ 2057 चौ.मी., बांधकाम क्षेत्रफळ 3372.55 चौ.मी. आहे. तळघरात पार्किंगची सोय व 5 गाळे आहेत. ग्राऊंड फ्लोअर व पहिला मजला 18 गाळे, दुसरा मजल्यावर तासगाव नगरपरिषद सभागृह, 5 सभापती केबिन व विविध विभाग, तिसऱ्या मजल्यावर तासगाव नगरपरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी केबिन व विविध विभाग आहेत.

सूत्रसंचालन नितीन खांडेकर यांनी केले. आभार पृथ्वीराज पाटील यांनी मानले.

00000

The post first appeared on .

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.