कात टाकणारा भारत सर्जकतेच्या मार्गावर
esakal October 09, 2024 08:45 AM

- अनुराग सक्सेना

आपली प्रतिभा आणि आपल्या आकांक्षा जगाने पाहण्याची ही वेळ आहे. तथापि आपल्या क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्यासाठी भारतानेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.

अनेक शतकांपासून पाश्चिमात्य देशांनी नवोन्मेष, बौद्धिक संपदा (IP) आणि तंत्रज्ञानप्रगतीचा अथक पाठपुरावा यावर लक्ष केंद्रित केल्याची फळे चाखली आहेत. उत्पादन आणि सेवा यांच्या सृजनाचा गौरव करत या राष्ट्रांनी आपल्या शोधांमधून कमाई तर केलीच; त्याचबरोबर त्यांच्या कल्पना जागतिक स्तरावर निर्यात केल्या आणि आर्थिक ऊर्जाकेंद्र म्हणून स्वतःला स्थापित केले.

उदाहरणार्थ अमेरिकेने इंटरनेट, औषधनिर्मिती आणि एअरोस्पेस यासारख्या परिवर्तनकारक नवोन्मेषाच्या माध्यमांद्वारे आपली उत्पादने आणि सेवांना जागतिक मागणी निर्माण करत उद्योग क्षेत्राचे परिवर्तन घडवले. त्याचप्रमाणे युरोपियन राष्ट्रांनी पायाभूत सुविधा (रेल्वेमार्गांचा आर्थिक दृष्ट्या फायदा लक्षात घ्या), ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी आणि चैनीच्या वस्तू या क्षेत्रात आघाडी घेतली; जिथे नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा हे जागतिक प्रभुत्वाच्या केंद्रस्थानी आहेत.

याउलट भारत आणि चीन यासारख्या अर्थव्यवस्थांनी ऐतिहासिकदृष्ट्या उत्पादन आणि सेवा यावर आपल्या विकासाची भिस्त ठेवली. मूल्यवर्धनाच्या दृष्टिकोनातून दोन्ही खालच्या स्थानावर आहेत. औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी प्रभावी ठरणारा हा दृष्टिकोन, नवोन्मेष किंवा बौद्धिकसंपदा निर्मिती या प्रत्यक्ष चलनी ठरू शकणाऱ्या बौद्धिक संपत्तीला प्राधान्य देत नसल्याने प्रगत तंत्रज्ञानाचे सृजक ठरण्याऐवजी या राष्ट्रांना ग्राहक म्हणून ठेवतो.

तथापि चीनने गेल्या काही वर्षात नवोन्मेष,बौद्धिकसंपदा आणि तंत्र प्लॅटफॉर्म यावर प्रचंड गुंतवणूक करत हे मॉडेल मोडीत काढले. टेलिकम्युनिकेशन, सोशल मीडिया आणि गेमिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत हुवावे,टिक- टॉक आणि टेनसेंट यासारख्या जागतिक बलाढ्य कंपन्यांचे उदाहरण घालून दिले. यासारख्या प्रयत्नांनी चीनची देशांतर्गत अर्थव्यवस्था तर बळकट केलीच; त्याचबरोबर बलाढ्य जागतिक निर्यातदार म्हणून स्थान प्राप्त करत जगभरातून बहुमोल अशी ‘डाटा पोहोच’ प्रदान केली.

भारताने मात्र वेगळा मार्ग चोखाळला. उत्पादनीकरण आणि तंत्रज्ञाननिर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भारत संपर्क केंद्रे, जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) आणि माहिती तंत्रज्ञान सेवा यांना पर्याय बनला. यामुळे ‘बॅकरूम ऑफ द वर्ल्ड’ ही उपाधी भारताने प्राप्त केली. आर्थिकदृष्ट्या लाभाच्या या भूमिकेने नवोन्मेष आणि उच्च मूल्याच्या तंत्रज्ञाननिर्मितीत मात्र देशाला पिछाडीवर ठेवले. सेवा प्रदान करण्यात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या भारताने नवोन्मेष आणि उत्पादनविकास प्रयत्नांमध्ये अग्रगण्य ठरण्याऐवजी अनेकदा इतर देशांना यामध्ये सहाय्य दिले.

लक्षणीय परिवर्तन

मात्र गेल्या दशकात भारताच्या जागतिक स्तरावरच्या भूमिकेत लक्षणीय परिवर्तन दिसून आले. विविध क्षेत्रात आपले सामर्थ्य दाखवत भारत भू-राजकीय शक्ती म्हणून उदयाला आला. मुत्सद्देगिरीच्या दृष्टिकोनातून पाहता, आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये आपली स्वायत्तता अखंड राखत, महासत्तांशी धोरणात्मक भागीदारी करत भारताने जागतिक स्तरावर अधिक ठाम स्थान घेतले आहे.

भू-राजकीय क्षेत्रात भारताने आपल्या संरक्षणक्षमता बळकट केल्या असून हिंद- प्रशांत क्षेत्रात चीनच्या प्रभावाचा मुकाबला करत ‘क्वाड’सारख्या उपक्रमांमध्ये भारत महत्त्वपूर्ण राहिला आहे. व्यापार आघाडीवर, व्यापार करारांच्या पुनर्वाटाघाटी केल्या आणि जागतिक पुरवठासाखळीत, विशेषकरून कोविडमुळे जागतिक पुरवठासाखळी विस्कळीत झालेली असताना महत्त्वाचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाऊ लागले आहे.

ही नवी खंबीरता आता ‘क्रिएट इन इंडिया’ अर्थात ‘भारतात उत्पादन करा’ यामोहिमेत दिसते आहे. त्यावर भारताने सध्या लक्ष केंद्रित केले आहे. नवोन्मेष संस्कृतीची जोपासना करत आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासाला पाठबळ देत पुढच्या शतकात, अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर अशा दोन्ही दृष्टीने स्वतःचे प्राबल्य निर्माण करण्याच्या स्थितीमध्ये भारत आहे.

आर्थिकदृष्ट्या, निर्मितीवर लक्ष केंद्रित केल्याने मूल्यसाखळीमध्ये पुढे जाणे, आपल्या बौद्धिक संपत्तीवर उच्च लाभ निर्माण करणे आणि परदेशी तंत्रज्ञानावरचे अवलंबित्व कमी करणे भारताला शक्य होणार आहे. ‘सॉफ्ट पॉवर’च्या दृष्टीने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या आघाडीमुळे,विपर्यस्त पाश्चिमात्य नरेटीव्हवर सातत्याने प्रतिक्रिया देण्याऐवजी, भारताला स्वतःच्या नरेटीव्हला आकार देणे शक्य होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा, ‘चला सर्वांनी एकत्रितपणे ‘क्रिएट इन इंडिया’ चळवळ सुरु करण्याची हाक दिली तेव्हा प्रत्येकाला त्यातला गर्भितार्थ समजला नव्हता. इस्टमन कलर आणि विनाईल तंत्रज्ञानाने अमेरिकेच्या नायक आणि रॉकस्टार्सना जोमदार वाटचालीसाठी मदत केली. ‘एक्सआर’ आणि ‘गेमिंग’चे युग भारताला पुढे नेण्यासाठी सहाय्य करेल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅएन्ड एन्टरटेनमेंट समिट(WAVES) २०२५ अंतर्गत ‘एव्हीजीसी’ क्षेत्रातल्या आपल्या भविष्याचे जगाला दर्शन घडवणाऱ्या ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ या अशा प्रकारच्या पहिल्या परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. आशय आणि गेम्समध्ये २५ प्रकारात आपल्या सर्वोत्कृष्ट प्रतिभेचे दर्शन या विस्तृत चॅलेंजच्या माध्यमातून घडणार आहे. अशा प्रकारच्या आणखी दृश्य कार्यक्रमांची भारताला आवश्यकता आहे. आपली प्रतिभा आणि आपल्या आकांक्षा जगाने पाहण्याची ही वेळ आहे.

तथापि आपल्या क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्यासाठी भारतानेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. एव्हीजीसी क्षेत्र डिजिटल संवाद आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करते. भविष्याचे हे द्वार खुले करण्यासाठी कौशल्यविकास, गुंतवणूक पाईपलाईन, व्यापक व्यासपीठ, प्रगतीशील नियामक चौकट यासह इतर अनेक बाबींची आवश्यकता आहे. खरे तर ही चढती भाजणी आहे; पण गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या गंगोत्रीप्रमाणे आपण स्थापना करून जागतिक आर्थिक पटलावर आपले नेतृत्व आणि येत्या काळासाठी आपले नरेटिव्ह सुनिश्चित करू शकतो.

(लेखक धोरणविषयक बाबींचे तज्ज्ञ असून स्तंभलेखक आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पर्यटन सल्लागार परिषदेचे ते नामनिर्देशित सदस्य आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.