Haryana Election : हरियानातील हॅट्रिकनंतर भाजपचं खास सेलिब्रेशन! राहुल गांधींना पाठवली खास भेट
esakal October 09, 2024 03:45 PM

हरियाना विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक केली आहे. या मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिलेबीची चांगलीच चर्चा झाली होती. भाजपने या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपकडून राहुल गांधी यांच्या सरकारी बंगल्यावर एक खास गिफ्ट पाठवण्यात आले आहे आहे.

हरियानातील गोहाना येथे रॅलीच्यावेळी एका स्थानिक मिठाई दुकानातील जिलेबीबद्दल राहुल गांधी यांचे एक वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर आता राहुल गांधींवर निशाणा साधत हरियाना भाजपने त्यांच्या घरी जिलेबी पाठवली आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या घरी जिलेबीचा एक डब्बा पोहचवण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर दिली असल्याचे सांगितले आहे. एक फूड एग्रीगेटर अॅपचा स्क्रिनशॉटनुसार, कॉनॉट प्लेसच्या एका प्रसिद्ध दुकानातून २४, अकबर रोडवर एक किलो डीप-फ्राइड स्वीटची ऑर्डर देण्यात आली होती.

हरियाना भाजपने एक्सवर या ऑर्डरबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष हरियानाच्या सर्व कर्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या घरी जिलेबी पाठवण्यात आली आहे.

नेमकं काय झालं होतं?

राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोहाना येथे एक भाषण देत होते, यावेळी त्यांनी स्थानिक मिठाईच्या दुकानातील (माटू राम हलवाई) जिलेबीची स्तुती केली आणि ही जिलेबी भारतात सगळीकडे विकली गेली पाहिजे असेही म्हटले. इतकेच नाही तर जिलेबी निर्यात करण्याबद्दल देखील राहुल गांधी यांनी व्यक्तव्य केले. ते म्हणाले की. जर जिलेबी फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात तयार केली गेली तर यामधून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

पण त्यांच्या भाषणाचा काही भाग इंटरनेटवर मीमच्या स्वरूपात व्हायरल झाला होता. यावेळी अनेकांनी जिलेबी ताजीताजी खाण्यासाठी असते, फॅक्टरीमध्ये बनवून विकण्यासाठी नाही असेही सुनावले.

दरम्यान हरियानामधील मोठ्या विजयानंतर जिलेबीसंबंधी चर्चा फक्त हरियानापुरती मर्यादीत राहिली नाही. गुजरात भाजपने देखील मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह आपल्या नेत्यांसोबतचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये एका जिलेबी पार्टीमध्ये ते एकमेकांना जिलेबी खाऊ घालताना दिसत आहेत.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर जेव्हा भाजपने सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये हरियानात शानदार पुनरागमन केले, तेव्हा भाजपने आनंद साजरा करण्यासाठी किमान १०० किलो जिलेबीची ऑर्डर दिली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील मजा घेत 'हे जे जिलेबीचे श्वप्न बाळगून बसले होते, त्यांच्या नशीबात जिलेबी नव्हती' असा टोला लगावला.

माजी भाजप प्रवक्ता नुपूर शर्माने देखील पक्षाच्या नेत्यांसोबत जिलेबी खात स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. त्यासोबत त्यांना आज जिलेबी जास्तच स्वादीष्ट लागत होती असे कॅप्शन देखील दिले.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

गोहानामध्ये रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी प्रसिद्ध दुकानातील जिलेबीचा एक डब्बा दाखवत म्हटले होते की त्यांनी कारमध्ये जंबो जिलेबीचा अस्वाद घेतला आणि त्यांची बहीण आणि पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना संदेश पाठवला की त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात चांगली जिलेबी खाल्ली आहे.

पण निवडणुकीत गोहाना येथे भाजपने दमदार कामगिरी केली, भाजप उमेदवार अरविंद कुमार शर्मा यांनी जगबीर सिंह मलिक यांच्यावर सहज विजय मिळवला. शर्मा यांना एकूण ५७,०५५ मते मिळाली आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला १०,४२९ मतांच्या फरकाने पराभूत केले. येथे एकूण ११ उमेदवार मैदानात होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.