तिकीट देण्यासाठी भाजपचा ‘मध्यप्रदेश पॅटर्न’, बंद लिफाफा काय सांगतो?; काय आहे पॅटर्न?
GH News October 09, 2024 06:15 PM

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये हुरुप वाढला आहे. महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून योग्य उमेदवार निवडण्याची कसरत भाजपने सुरू केली आहे. यासाठी भाजपने मध्यप्रदेशचा पॅटर्न राबवला आहे. राज्यात पहिल्यांदाच हा पॅटर्न राबवला गेला आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवारांना तिकीट मिळणार आणि कुणाला नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपच्या मध्यप्रदेश पॅटर्ननुसार भाजपने यंदा विधानसभेचा कल जाणून घेण्यासाठी बाहेरून निरीक्षक नेमले होते. या निरीक्षकांनी प्रत्येक विधानसभेत जाऊन पदाधिकाऱ्यांचं मतदान घेतलं. प्रत्येक विधानसभेतील पदाधिकाऱ्यांकडून तीन उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात घेण्यात आली. हा बंद लिफाफा भाजपच्या श्रेष्ठींकडे सोपवला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पक्ष श्रेष्ठी हा लिफाफा उघडून कुणाला तिकीटासाठी पसंती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या या मध्यप्रदेश पॅटर्नमुळे अनेक इच्छुकांची धाकधूक वाढल्याचंही पाहायला मिळत आहे.

अनेकांचं नशीब बंद

निरीक्षकांनी राज्यातील सर्व्हे करून मतदारसंघातील इच्छुकांची पार्श्वभूमी जाणून घेतली आहे. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात तीन इच्छुकांची नावे काढली असून बंद लिफाफ्यात ही नावे ठेवली आहेत. हा लिफाफा पक्षाचे राज्यातील नेते उघडून त्यातील एक नाव फायनल करणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. मध्यप्रदेशातही हाच पॅटर्न राबवण्यात आला होता. त्यामुळे मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. त्याचीच पुनरावृती आता महाराष्ट्रात होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज पत्रकार परिषद

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुती एकसंध राहणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जात असताना आज महायुतीच्या प्रमुख पक्षांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. विधानसभेसाठीच्या महायुतीच्या समित्या आणि इतर बाबींची घोषणा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार आहे. परंतु, जागावाटपाच्या संदर्भात काही घोषणा होणार का नाही याबाबत कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. या पत्रकार परिषदेला भाजपकडून मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संबोधित करणार आहेत. महायुतीच्या पत्रकार परिषदेला भाजपकडून प्रसाद लाड, शिवसेनेकडून शंभुराज देसाई, राष्ट्रवादीकडून माजी खासदार आनंद परांजपे आणि शिवाजीराव गर्जे उपस्थित राहणार आहेत.

आमच्यात समन्वय

दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी शंभुराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधला. निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. आमच्या संयुक्त बैठका झाल्या आहेत. 288 मतदारसंघात महायुतीचे समन्वयक नेमण्यात आले आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत. महायुतीत संपूर्णत: समन्वय आहे. तिन्ही पक्षातील राज्यातील प्रमुखांना सर्व बाबतीत सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. उमेदवारी मागणं हे लोकशाही जिवंत असल्याचं प्रमाण आहे. आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही, असं शंभुराज देसाई म्हणाले.

बार्गेनिंग पॉवर वाढली

शंभुराज देसाई यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका केली. उबाठाचे नेते सतत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा म्हणतात. पण तशी घाई आम्हाला नाही. बहुमताच्या पुढे जाऊन जागा जिंकायचा आहेत. हरियाणा निवडणुकीनंतर बार्गेनिग पावर वाढली, असं शंभुराज देसाई म्हणाले.

थोडा धीर धरा

महायुतीला लागलेल्या गळतीवरही त्यांनी भाष्य केलं. उमेदवारी मिळणार नाही याचा अंदाज आला की पक्ष सोडतो. समरजित घाटगे यांना वाटलं असेल की मुश्रीफ यांना उमेदवारी मिळेल. तसं अनेक ठिकाणी झालंय. थोडा धीर धरा, गळतीपेक्षा अधिक भरती येईल, असा दावा देसाई यांनी केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.