IND vs BAN : टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, बांगलादेश रोखणार? कोण जिंकणार?
GH News October 09, 2024 08:13 PM

भारतीय क्रिकेट टीम विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी 20I मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा आज 9 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (आधीचं फिरोजशाह कोटला) करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी या दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची नामी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशसाठी हा करो या मरो असा सामना आहे. बांगलादेशला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता बांगलादेश टीम इंडियाला मालिका विजयापासून रोखून विजयाचं खातं उघडणार का? याकडे साऱ्यांचीच करडी नजर असणार आहे.

टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला होता. भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांनी शानदार कामगिरी करत सहज विजय मिळवला होता. टीम इंडियाने आधी बांगलादेशला 19.5 ओव्हरमध्ये 127 धावांवर रोखलं. त्यानंतर टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 49 बॉल राखून हे आव्हान पूर्ण केलं. टीम इंडियाने 11.5 ओव्हरमध्ये 132 धावा करत 7 विकेट्स विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

बांगलादेशसाठी अखेरची संधी

टीम इंडियाने बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश दिला. आता बांगलादेशला या टी 20I मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल, तर हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. बांग्लादेश यासाठी दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकते. तसेच अखेरची संधी असल्याने बांगलादेश या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे बांगलादेश टीम इंडियासमोर कशी खेळते? हे पाहणंही तितकंच उत्सुकतेचं असणार आहे.

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.

बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.