राजापूर- प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच निर्णय
esakal October 10, 2024 12:45 AM

17561

‘प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना
विश्वासात घेऊनच निर्णय’
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ः प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. यापुढे कोणत्याही प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनातील गैरसमज दूर करून आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आणि कणा आहे. त्यांच्या विरोधात जाऊन कोणतीही भूमिका घेण्यात येणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरीच्या धर्तीवर राजापूर येथे जानेवारीत कॅशलेस हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सुमारे ६ कोटी २२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणार्या तालुक्यातील जैतापूर प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री सामंत बोलत होते. या वेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, अमजद बोरकर उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, राजापूर मतदार संघात गेल्या तीन-चार महिन्यात आरोग्य विभागाने क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये लांजा रुग्णालय स्थलांतर, नवीन रुग्णालयाचे बांधकाम, राजापूर ग्रामीण रुग्णालयात चांगली सुविधा उपलब्ध करून देणे, ५६ कोटी खर्च करून बांधण्यात येत असलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, साडेसहा कोटी खर्च करून बांधण्यात येत असलेले भांबेड प्राथमिक आरोग्यकेंद्र आदींचा समावेश आहे. या सोबतच पाणीप्रश्न सोडवण्यासाठी धरणाच्या कामाचा प्रश्नही मार्गी लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पासंबंधी भूमिकेवरून आमदार राजन साळवी यांच्यावर मंत्री सामंत यांनी टीका केली. ते म्हणाले, माजी खासदार विनायक राऊत यांची पहिल्यापासून प्रकल्पविरोधी भूमिका राहिली आहे; मात्र आमदार राजन साळवी यांचा कधी विरोध तर कधी समर्थन, अशी बदलती भूमिका राहिली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.