उद्योगनगरी झालीय 'सिटी ऑफ होप' उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन; विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन
esakal October 10, 2024 01:45 AM

पिंपरी, ता. ९ ः उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. येथील नागरिकांना दर्जेदार आणि मूलभूत सेवा देण्यासाठी महापालिका अविरतपणे काम करत आहे. नागरिकांच्या आशा आकांक्षांना मूर्त रूप देणारे पिंपरी-चिंचवड ‘सिटी ऑफ होप’ झाले आहे, असे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे ई-उद्घाटन, लोकार्पण आणि प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याअनुषंगाने पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शहरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर उपयुक्त ठरत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळाली आहे.’’
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. शहरातील सर्व घटकांचा सर्वांगीण विचार करून, महापालिकेने अनेक प्रकल्पांची उभारणी केली असून विकास प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे.’’

अजित पवार म्हणाले...
- पिंपरी-चिंचवड शहर राज्याचे ग्रोथ इंजिन
- मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम सुरू
- कायदा सुव्यवस्थेसाठी गुंडगिरी खपवून घेणार नाही
- पिंपरीत माता रमाईंचा पुतळा उभारण्याची कार्यवाही सुरू

उद्घाटन झालेले प्रकल्प
- बोपखेल येथील मुळा नदीवरील पूल
- सांगवी-बोपोडी मुळा नदीवरील पूल
- स्मार्ट सिटी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर
- आकुर्डी, पिंपरी आवास योजनेतील सदनिका वाटप
- आकुर्डी रेल्वेस्टेशनजवळील खाद्य पदार्थ केंद्र
- भोसरी, केशवनगर, चिंचवड, वाल्हेकरवाडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
- इंद्रायणीनगर आणि जाधववाडी उद्यान
- थेरगाव येथील शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन
- पिंपळे सौदागर येथील पवना नदीवरील पूल
- पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्ता

भूमिपूजन झालेले प्रकल्प
- निगडीतील २० किलोमीटर हरित सेतू प्रकल्प
- सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर रक्षक चौक भुयारी मार्ग
- मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प
- तळवडेतील बायोडायव्हर्सिटी पार्क
- वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर परिसरातील रस्ते
- निगडी जलशुद्धीकरण केंद्रापासून दापोडीपर्यंत जलवाहिनी
- टाकाऊ वस्तूंपासून वर्ल्ड पार्क, बॉलिवूड पार्क उभारणे
---

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.