शैक्षणिक साहित्याचे ५०० विद्यार्थ्यांना वाटप
esakal October 10, 2024 03:45 AM

पुणे, ता. ९ ः पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील निवडक पहिली ते दहावीच्या गरजू पाचशे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप बुधवार पेठ येथील ‘सकाळ’ कार्यालयात करण्यात आले.
यावेळी श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, मदन जैन, ललिता करवा, शरद सारडा व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य वाटप प्रकल्पाचे हे सलग चौथे वर्ष होते. उपक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून ‘सकाळ’ प्रतिनिधींमार्फत गरजू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये दुर्गम भागातील विद्यार्थ्यांबरोबरच स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.

किटचे स्वरूप
स्कूल बॅग, दहा वह्या, कंपास बॉक्स, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स, चित्रकला वही, रंगसाहित्य, सतरंजी, चादर व टॉवेल.

सकाळ सोशल फाउंडेशन अंतर्गत अनेक समाजविधायक उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. शाळा स्तरावर देखील शैक्षणिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. अशा सामाजिक उपक्रमांना श्री मुकुंद भवन ट्रस्ट कायम सहकार्य करत आहे व यापुढेही सहकार्य राहील, तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी अशा उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.
- पुरुषोत्तम लोहिया, कार्यकारी विश्वस्त, श्री मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.