Pune News : युवकांना मिळणार दहा हजार रुपयांपर्यंत मासिक स्टायपेंड
esakal October 10, 2024 05:45 AM

पुणे - युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळावे आणि नोकरी मिळविण्यासाठी त्यांची क्षमता वाढावी, या उद्देशाने राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत बारावीच्या झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये, तर पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण झालेल्यांना दहा हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड दिला जाणार आहे.

राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत ही योजना राबविली जात आहे. या उपक्रमांर्तगत ‘https://rojgar.mahaswayam.gov.in/’ संकेतस्थळाद्वारे रोजगार इच्छुकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांशी जोडण्यात येणार आहे.

बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असणार आहे. प्रशिक्षणासाठी १८ ते ३५ वयोगट असावा, असे आवाहन तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी केले आहे.

शैक्षणिक अर्हतेप्रमाणे असा स्टायपेंड मिळणार -

  • शैक्षणिक पात्रता : स्टायपेंड (प्रति महिना)

  • बारावी :  सहा हजार रुपये

  • आयटीआय/पदविका : आठ हजार रुपये

  • पदवीधर/पदव्युत्तर : दहा हजार रुपये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.