पिंक रिक्षांचा 'मार्ग' मोकळा
esakal October 10, 2024 07:45 AM

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ९ : राज्य सरकारने वाहतूक कोंडी होऊ नये, या करिता पुणे शहरातील १४ रस्त्यांवर ई-रिक्षा चालविण्यास बंदी घातली होती. मात्र, ती बंदी मागे घेत पुणे शहरातील कोणत्याही रस्त्यांवर, भागात आता ई- रिक्षाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरात पिंक (गुलाबी) रिक्षा धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शहरात १४०० गुलाबी रिक्षा धावणार असून, यातून तितक्याच महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
राज्यातील महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक- सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ‘पिंक ई-रिक्षा’ योजना सुरू केली. राज्यातील १७ शहरांत १० हजार पिंक रिक्षांना मंजुरी दिल्याने १० हजार महिलांना रिक्षाचा व्यवसाय करता येणार आहे. रिक्षा चालवणे हा स्वयंरोजगाराचा भाग आहे. यासाठी सर्व करांसह ई-रिक्षांच्या एकूण किमतीवर राज्य सरकारकडून २० टक्के अनुदान देण्यात येईल. पाच वर्षांच्या मुदतीसाठी ७० टक्के रकमेचे कर्ज उपलब्ध करून उर्वरित १० टक्के रक्कम संबंधित महिलेला गुंतवावी लागणार आहे. दरम्यान, पिंक रिक्षा ही ई-रिक्षा आहे. या रिक्षाचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे. वेग कमी असल्याने हे वाहतूक पोलिसांनी पुण्यातील १४ रस्त्यांवर ई-रिक्षाला बंदी घातली होती. मात्र, राज्य सरकारने ती बंदी हटविली आहे. त्यामुळे पिंक रिक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.

या रस्त्यांवर होती बंदी
- पद्मावती चौक ते बालाजीनगर चौक
- पुष्पमंगल चौक ते चंद्रलोक चौक
- खडीमशीन चौक ते ५०९ चौक
- गणपती माथा ते कोंढवे धावडे
- संभाजी चौक ते भक्तीशक्ती चौक
- धायरी फाटा चौक ते राजाराम पूल चौक
-पाषाण-सूस रस्त्यावर साई चौक ते सूसखिंड चौक
- सांगवी फाटा ते कस्पटे चौक
- काळेवाडी फाटा ते पिंपरी
- नाशिक फाटा ते कस्पटे चौक
- कमांड रुग्णालय रस्ता
- बी. टी. कवडे रस्ता
- वानवडी बाजार रस्ता

हे आहेत निकष :
-पिंक ई-रिक्षा’ योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक
-अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान
-महिलेकडे वाहनचालक परवाना असणे आवश्यक
-दारिद्र्यरेषेखालील महिलांना योजनेत प्राधान्य
-सर्व स्तरांतील महिलांना योजनेत अर्ज करता येईल

या शहरांचा समावेश
मुंबई उपनगर - १४००
ठाणे - १०००
पुणे - १४००
नवी मुंबई - ५००
कल्याण -४००
पनवेल -३००
डोंबिवली - ४००
वसई-विरार - ४००
नाशिक - ७००
पुणे - १४००
नागपूर - १४००
अहमदनगर - ४००
पिंपरी - ३००
अमरावती - ३००
चिंचवड -३००
छत्रपती संभाजीनगर - ४००
कोल्हापूर - २००
सोलापूर - २००



वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहरातील काही भागांत ई-रिक्षांना बंदी घालण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने ती बंदी नुकतीच हटविली असल्याने आता पुण्यातील सर्वच रस्त्यांवरून ई-रिक्षा धावू शकेल.
-स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.