मराठा आरक्षण हटविण्यासाठी कोर्टात लढलो, जिंकलो; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा, मविआ सरकारसंबंधी म्हणाले...
Times Now Marathi October 10, 2024 01:45 AM

Gunaratna Sadavarte: सध्या बिग बॉसच्या 18 व्या सिझनला सुरूवात झाली आहे. यंदा गुणरत्न सदावर्तेही बिग बॉसच्या घरात गेले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावेळी घरात त्यांनी अनेक सनसनाटी दावे केले आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. 6 ऑक्टोबरपासून बिग बॉसच्या 18 व्या सिझनला सुरूवात झाली आहे. गुणरत्न सदावर्तेंना बिग बॉसच्या शोमध्ये पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मराठा आरक्षण गुणरत्न सदावर्तेंमुळे रद्द झालं? मविआ सरकार पाडण्यासाठी गुणरत्न सदावर्तेंनी मदत केली? असे मोठे गौप्यस्फोट खुद्द गुणरत्न सदावर्तेंनी केले आहे. घरातील काही सदस्यांशी आपली ओळख करून देताना गुणरत्न सदावर्तेंनी सनसनाटी गौप्यस्फोट केले आहेत, ज्याची एकच चर्चा आहे. सदावर्तेंचे हे व्हिडीओ सध्या महाराष्ट्रात तुफान व्हायरल होत आहेत.

मराठा आरक्षण हटविण्यासाठी लढलो, जिंकलो - गुणरत्न सदावर्ते
'डंके की चोट पे' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात पुरता धुमाकूळ घातला आहे. बिग बॉसचा हिंदीचा 18 वा सिझन सुरू झाला आणि गुणरत्न सदावर्ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. यावेळी त्यांनी दोन मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ज्यातला पहिला गौप्यस्फोट असा की, महाविकास आघाडी सरकारचं कोसळणं मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बंड आणि नंतर महायुती सरकार स्थापन होणं हा आहे तर दुसरा गौप्यस्फोट चक्क मराठा आरक्षणावर आहे. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये एका सदस्याशी बोलताना सदावर्ते म्हणाले की, ''मी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी, कमीत कमी आरक्षण यांसारख्या मोठ्या प्रकरणात कोर्टात लढलो आहे. महाराष्ट्रातून मराठा आरक्षण हटवण्याच्या प्रकरणातही मी लढलो आहे आणि जिंकलोही आहे.''

मुख्यमंत्री एकनाथ शिंंदेंच्या बंडात मीच आमदार फोडले, गुणरत्त सदावर्तेंचा खळबळजनक दावा

उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार पाडायला सदावर्तेंनी सहा महिन्यांचे मिशन चालवले. यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पूर्णपणे मोरल डाऊन झाले. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केले. त्यांच्या बंडात काही आमदार खुद्द सदावर्तेंनी फोडले, असा खळबळजनक दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.


...तर माझा एन्काऊंटर झाला असता, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर खुलासा

महाविकास आघाडीच्या काळात सदावर्तेंना अटक झाली होती. शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला गाजला होता. तेव्हा अटक झालेल्या गुणरत्न सदावर्तेंचा एन्काऊंटर केला जाणार होता, असा दावा खुद्द गुणरत्न सदावर्तेंनीच केला आहे. अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.