Ratan Tata Passed Away: टाटांच्या जाण्याने अदानी, अंबानी, महिंद्रा भावुक; भावनांना वाट मोकळी करुन देत वाहिली श्रद्धांजली
esakal October 10, 2024 06:45 AM

Ratan Tata passed away: आपल्या दातृत्वाने जगभरात ख्याती असलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटांच्या जाण्याने जगभरातलं उद्योगविश्व हळहळलं आहे. भारतातल्या मोठ्या उद्योजकांनी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी- मुकेश अंबानी

देशासाठी आणि देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने फक्त टाटा ग्रुपला नव्हे तर प्रत्येक भारतीयाला मोठा तोटा झाला आहे, अशी प्रतिक्रिया रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली.

अंबानी पुढे म्हणाले की, रतन टाटा यांच्या जाण्याने मी एक वैयक्तिक मित्र देखील गमावला आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर मला वेगळीच प्रेरणा आणि ऊर्जा मिळत गेली. त्यामुळे त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या नैतिक मूल्यांवरील माझा आदरही द्विगुणीत होत गेला. अत्यंत दूरदृष्टीचे उद्योजक आणि समाजसेवी असलेले रतन टाटा नेहमीच समाजाच्या भल्यासाठी धडपडत होते. रतन टाटा यांच्या जाण्याने देशाने आपला एक सहृदयी पुत्र गमावला आहे. रतन टाटा यांनी भारताचे नाव साऱ्या जगात नेले आणि साऱ्या जगातील जे जे सर्वोत्तम ते ते भारतात आणले. त्यांनी १९९१ मध्ये टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर समूहाला किमान ७० पटीने वाढवले. रिलायन्स उद्योग समूह, नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबीयांतर्फे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत असून टाटा कुटुंबिय आणि टाटा समूह यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रतनजी तुमच्या स्मृती नेहमीच माझ्या हृदयात कायम राहतील, असेही मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

महान व्यक्तिमत्व कधीच आपल्यातून जात नाहीत- आनंद महिंद्रा

रतन टाटा आपल्यात नाहीत हे स्वीकारण्यास माझे मन तयार होत नाही. आज देशाची अर्थव्यवस्था मोठी झेप घेण्याच्या तयारीत असताना त्यामागे रतन टाटा यांनी आयुष्यभर घेतलेली मेहनत आणि केलेला त्याग यांचे फार मोठे स्थान आहे. आता ते गेल्यानंतर त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरच वाटचाल करणे एवढेच आपण करू शकतो. त्यांची आर्थिक संपत्ती आणि यश हे जागतिक मानवसेवेसाठी उपयोगी ठरले तरच ते सर्वात मूल्यवान आहे अशी त्यांची श्रद्धा होती. महान व्यक्तिमत्व कधीच आपल्यातून जात नाहीत. त्यांच्या स्मृती सर्वत्र कायम राहतील, अशी प्रतिक्रिया उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली.

सर्वाचे भले करण्याची इच्छा - गौतम अदानी

आधुनिक भारताचा मार्गच बदलून टाकणारे महान दूरदृष्टीचे एक व्यक्तिमत्व देशाने गमावले आहे. रतन टाटा हे फक्त उद्योग क्षेत्रातील आदरणीय नाव नव्हते, तर त्यांनी आपल्या प्रामाणिकपणा सहृदयता या गुणांनी आपल्याला साऱ्या देशाशी जोडून घेतले होते. सगळ्यांचे चांगले करण्याच्या इच्छेने त्यांना झपाटून टाकले होते. अशी व्यक्तिमत्वे कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत, अशी प्रतिक्रिया अदाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्यक्त केली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.