Aditya Thackeray : "...अन् आदित्य ठाकरे तोंडावर आपटले", भाजप नेत्याने काढली खपडपट्टी
Sarkarnama October 10, 2024 08:45 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. या प्रकल्पातील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते. त्यातील मुंबई मेट्रो लाइन 3 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

'मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो सर्वसामान्यांसाठी सुरू झाली असून ही मेट्रो सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मेट्रोला मुंबईकरांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आहे. स्थानकावर तिकिटांसाठी लांब रांगा लागल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच 'मेट्रो मॅन' ठरले असून आदित्य ठाकरे तोंडावर आपटले असल्याची,' टीका मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी केली.

'मेट्रोला महाविकास आघाडीने रोखले होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. त्यामुळे विरोधकांचे तोंड आपोआप बंद झाले आहे,' टीका मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी केली आहे.

का थांबलं होतं मेट्रोचं काम?

फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडे तोडण्यात आली. त्याविरोधात वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. स्थानिकांसह मुंबई आणि परिसरातील नागरिक आणि वृक्षप्रेमींनी आंदोलनही केलं होतं. आरेतील वृक्षतोड प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे. कारशेड म्हणजे मेट्रो मार्गिकेतील अत्यंत महत्त्वाचा घटक. मेट्रोच्या गाड्या उभारण्याचे आणि गाड्यांच्या दुरुस्तीचे काम कारशेडमध्ये होते.

आरे कॉलनीतील वृक्षतोड प्रकरणावरून त्यावेळी सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेनं घडलेल्या प्रकाराचा कडाडून विरोध केला होता. मेट्रो कारशेडला विरोध करत आदित्य ठाकरे स्वत: आरे जंगलाच्या बचावसाठी मैदानात उतरले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात सत्ताबदल झाली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. ठाकरे सरकारनं आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षानं यानिर्णयाविरोधात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.