पतीच्या निधनानंतर फुलविली 'दुर्गे'ने अमेरिकन झुकिनी
esakal October 10, 2024 10:45 AM

आळेफाटा, ता.९ : भरपूर प्रमाणातील पोषक द्रव्ये, हृदयाचे ठोके तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणारी अमेरिकन झुकिनी या पालेभाजीच्या लागवडीचा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील नवदुर्गेने यशस्वी करून दाखविला आहे. वंदना संतोष गुंजाळ यांनी पतीच्या निधनाचे दुःख बाजूला सारत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत केवळ २० गुंठ्यात झुकिनीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

कोणत्याही महिन्यात येणाऱ्या आरोग्यदायी झुकिनीच्या पहिल्या तोड्यात गुंजाळ यांना १६३ नगांचे (३० किलो) उत्पादन मिळाले आहे. काकडीच्या आकाराच्या या गर्द हिरव्या फळाचे वजन २०० ग्रॅम असून, त्याला सुमारे १५ रुपये बाजारभाव मिळतो. गुंजाळ यांनी पहिल्याच पुणे तसेच मुंबईत पंचतारांकित हॉटेलात विक्रीसाठी पाठविला आहे.

प्रयोगशील शेतकरी वंदना गुंजाळ यांचे बी.ए.पर्यंत शिक्षण झाले आहे. पतीच्या निधनानंतर न डगमगता सुमारे पंधरा एकर जमीन त्या करत आहेत. शेतीमध्ये नेहमी त्या वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन उत्तमरीत्या फुलवितात. अधिक उत्पन्न देणारी पिके घेण्यासाठी त्या नेहमीच विविध ठिकाणच्या कृषी प्रदर्शनास भेट देतात व फायदेशीर शेतीचा अभ्यास करतात. त्यांनी पुणे येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनात झुकिनी या अमेरिकन पालेभाजीची माहिती घेतली व त्याचा सखोल अभ्यास करत कुटुंबीयांच्या मदतीने लागवडीचा निर्णय घेतला.
झुकिनीचे उत्पादन घेण्यासाठी सासूबाई मिनाक्षी, गणपत गुंजाळ व मुलगा ओंकार यांची मोलाची साथ मिळते, असे वंदना गुंजाळ यांनी सांगितले.


अशी केली लागवड
* पाच फुटांच्या अंतरावर बेड पाडले
* बेडवर शेणखत टाकून ट्रॅक्टरद्वारे मल्चिंग पेपर टाकला
* तीन फुटांच्या अंतरावर झुकिनीच्या १५०० बिया
* जैविक पद्धतीची औषधी फवारणी केली
* ३० ऑगस्टला नियोजनबद्धरीत्या लागवड

अशी असते झुकिनी
* भरपूर प्रमाणात पोषक द्रव्ये
* झुकिनीची झाडे बुटकी, झुडूप वजा असतात
* काकडीसारखी दिसणारे हे फळ गर्द हिरवे, पोपटी, राखाडी
* लागवडीसाठी लागतो ४० दिवसांनतर मिळतो उत्पादन


झुकिनीच्या उत्पादनासाठी सुमारे २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता हंगामात नव्वद हजार ते एक लाख रुपयेपर्यंतचा नफा मिळणार आहे. पालेभाजीस शहरांमध्ये चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. पुढील काळात अंदाजे तीन टन माल निघेल.
- वंदना गुंजाळ, झुकिनी उत्पादक

झुकिनी येथे घेतले जाते उत्पादन
* इटली * अमेरिका * ऑस्ट्रेलिया * मेक्सिको * फ्रान्स * तुर्कस्तान * ब्राझील * चीन * जर्मनी *भारत


05363, 05362

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.