शब्दांनी बांधलेले नाते
esakal October 10, 2024 10:45 AM

- शुभांगी गोडबोले, संस्थापक, औंध वाङ्मय मंडळ

टाळ्यांचा कडकडाट, पेहरावात झगमगाट आणि स्टेजवर उत्साहाचा गडगडाट... निमित्त होते औंध वाङ्मय मंडळाचे गॅदरिंग. कलाकार होत्या मंडळाच्या सभासद, वय वर्षे ५५ ते ९५.

मी ३२ वर्षांपूर्वी औंधमध्ये सुरू केलेले हे वाङ्मय मंडळ. चार जणींपासून सुरू केलेल्या या मंडळाचा आता वृक्ष झाला आहे. साहित्यिकांचे विचार ऐकणे हा मंडळाचा मूळ गाभा. दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी, दुपारी अडीच ते चार ही वेळ. त्यामुळे जिला या विषयाची खरी आवड आहे तीच मंडळाची सभासद होते आणि अशा समविचारी मैत्रिणींचा गोफ इथे विणला जातो.

वर्षात ट्रिप, खेळियाड, स्नेहसंमेलन, जनसेवा फाउंडेशनला कपडे देणे हे उपक्रम होतात. सन १९८८ मध्ये मी या भागात राहायला आले, तेव्हा मराठीत भाषणे ऐकणे, मराठी पुस्तकांवरची चर्चा करणे, याबाबत माझी बौद्धिक उपासमार सुरू झाली. भोवती खूपसे कॉस्मॉपॉलिटन वातावरण होते. म्हणून घरातच पाच जणींबरोबर मराठी पुस्तकावर चर्चा सुरू केली.

माझा स्वतःचा छपाईचा व्यवसाय असल्याने दुपारची झोपेची वेळ सत्कारणी लावावी या हेतूने वेळ दुपारची ठरवली. आता ३२ वर्षानंतरसुद्धा वेळ तीच आहे. त्यामुळे खरोखर या विषयाची आवड असणाऱ्या समविचारी महिला याच्या सभासद होतात. लवकरच पुस्तकावरून पुढे जाऊन वक्त्यांची भाषणे ऐकणे हा मुख्य गाभा मंडळाचा झाला. मंडळात येणारे वक्ते सभासदांनीच सुचवलेले असतात. अट एकच. तिने वक्त्याचे भाषण स्वतः ऐकलेले असले पाहिजे. तिला ते मंडळासाठी योग्य वाटले पाहिजे.

महिलांनी महिलांसाठी महिलांच्या चौफेर प्रगतीसाठी चालवलेले हे मंडळ. अनेक प्रकारचे उपक्रम इथे घेतले जातात. मंडळाची वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिका जूनमध्येच तयार असते. प्रत्येकीने आपल्या वाढदिवसाच्या महिन्यात ‘आपल्याला आवडलेले पुस्तक’ यावर तीन मिनिटे बोलावे. ‘माझे मनोगत’ या सदरात ‘मला समाजात काय बदल हवेत, आणि त्यासाठी मी काय प्रयत्न करते.’ याविषयी मत मांडायचे असते.

उत्तम कर्तृत्व, वाणीतील वक्तृत्व आणि भाषेवर प्रभुत्व असणारे अनेक वक्ते मंडळाला लाभले. उदाहरणार्थ, सिंधुताई सपकाळ, रेणू गावसकर, आरती दातार, मृणालिनी चितळे, वंदना बोकील, डॉ. रोहिणी पटवर्धन, अरूणा ढेरे, अनिल अवचट इ. दर तीन वर्षांनी कार्यकारिणी बदलते. यात संयोजक, हिशेबनीस, मासिका ‘संपदा’, ट्रिप, खेळियाड, गॅदरिंग यांचा समावेश असतो. यामुळे प्रत्येकीला तिच्या कल्पकतेला वाव मिळतो.

मासिका ‘संपदा’ फक्त चार पानांपासून सुरू झाली, ती आता साठ-सत्तर पानांची असते. यात लेख, कविता, चारोळ्या, मुखपृष्ठ यां साठीच्या स्पर्धा असतात. ट्रिपमुळे एकमेकींची ओळख व्हायला चांगलीच मदत होते. ‘खेळीयाड’मध्ये अनेक प्रकारचे खेळ घेतले जातात. नोव्हेंबर महिन्यात एखाद्या लेखक, लेखिकेवर कार्यक्रम आयोजित केला जातो.

गॅदरिंगमुळे स्क्रिप्ट लिहिणे, ते बसवणे, नृत्य यामुळे खूप वाव मिळतो. गॅदरिंगमुळे होणाऱ्या प्रॅक्टिसेसमुळे खऱ्या अर्थाने धमाल येते. एक छोटेसे व्यासपीठ स्वतःला व्यक्त होण्याकरता यामुळे मिळते. सभासदांचा एकमेंकींचा लाभणारा सहवास, सहभाग आणि सहयोग यामुळे आपापसातली मैत्री दृढ होते. मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून, पितृपंधरवडा झाला, की होणाऱ्या सभेत ‘जनसेवा फाउंडेशन’साठी शैक्षणिक साहित्य व कपडे गोळा केले जातात आणि त्या संस्थेकडे पाठवले जातात.

आता व्हीआरएस घेतलेल्या आणि वरील सगळ्या गोष्टी करायच्या राहून गेलेल्या बायका मंडळाच्या सभासद होतात. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या आणि भरपूर ऊर्जा असलेल्या महिला सभासद होत आहेत. त्यामुळे मंडळाच्या आधीच चैतन्य असणाऱ्या वातावरणात उत्साहाची भर पडली आहे. नवीन होणाऱ्या सभासदाला इथे होणाऱ्या रसाळ, रसरशीत, रंगतदार कार्यक्रमाची चाहूल आधीच लागलेली असते.

आवाहन

तुमचाही असा ग्रुप किंवा संस्था आहे? ती महिलांचे सक्षमीकरण, एकत्रीकरण, प्रशिक्षण किंवा इतर गोष्टींसाठी काम करते आहे का? त्यातून अनेकींना उभारी मिळाली आहे का? तर मग तुमच्या संस्थेविषयी आम्हाला नक्की लिहून पाठवा. शब्दमर्यादा पाचशे शब्द. लेखाबरोबर संस्थेच्या कामाशी संबंधित फोटोही अवश्य पाठवा.

मजकूर पाठवण्यासाठीचा पत्ता : maitrin@esakal.com

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.