ढिंग टांग : इव्हीएम : मशिन लर्निंग..!
esakal October 10, 2024 10:45 AM

इव्हीएमचे गौडबंगाल दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या यंत्राइतके बेभरवशी काहीही नाही. इव्हीएमच्या नादाला लागल्यास लोकशाही हमखास बुडण्याची गारंटीच आहे. किंबहुना, ती आत्ताच बुडबुडू लागली आहे, यात शंका नाही. आमचे परममित्र आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, उच्चशिक्षित नेते जे की जयरामजीकी रमेश यांनी इव्हीएममधील आणखी एक गडबड नुकतीच शोधून काढली.

ज्या इव्हीएम यंत्रांची ब्याटरी ९९ टक्के चार्ज दाखवत होती, त्या यंत्रांमधून कमळाला बदाबदा मते गेली, आणि ज्या यंत्रांमध्ये ६० टक्क्यांहून कमी चार्जिंग होते, त्यात काँग्रेसचा हात होता, असा त्यांचा शोध आहे. ब्राहो, ब्राहो!

आम्ही डोळे अत्यंत बारीक करुन यंत्रांचे हे वर्तन तपासले. जयरामजीकी रमेश यांचे निरीक्षण अचूक होते. सगळी गडबड त्या चार्जिंगची आहे. या अर्धवट चार्जिंगमुळेच काँग्रेसचे चार्जिंग हरयाणाच्या निवडणुकीत कमी झाले. चार्जिंग कमी झाले की काय होते, हे आपल्याला माहीत आहेच. साधा मोबाइल फोन बंद पडतो. बंद पडला नाही तर ब्याटरी सेविंग मोडमध्ये जातो. काँग्रेसच्या वाट्याला आलेली यंत्रे ही सेविंग मोडमध्ये गेली होती, हे मोडी लिपीत लिहिले तरी कोणालाही कळेल.

या कथित इव्हीएम घोटाळ्यात यंत्रांचे दोन प्रकार गुंतलेले आहेत. त्यांचा सेपरेट विचार केला की चित्र बरेच स्पष्ट होईल.

९९ टक्के चार्जिंग : इव्हीएम यंत्राच्या चार्जिंगला ‘सी’ टाइपचा चार्जर लागतो की छोट्या पिनेचा हे निवडणूक आयोगाने अजूनही स्पष्ट केलेले नाही. ‘चार्जर दाखवा’ अशी मागणी करण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे दाद मागायला (पक्षी : चार्जर मागायला) जाणार होते. पण मोबाइल फोनच चार्ज नसल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही, असे कळते.

९९ टक्के चार्जिंग केलेली यंत्रे ही स्पेशल असतात. त्यात ब्याटरीही चांगल्या दर्जाची (लिथियम) असते. ही सुपरशक्तीची ब्याटरी इलेक्ट्रिक वाहनांमध्येही वापरता येते. एका चार्जिंगमध्ये तीनशे किलोमीटरचा पल्ला नॉन स्टॉप गाठता येतो. चार्ज चांगला असल्यामुळे यंत्र पूर्ण क्षमतेने काम करते. स्टोरेज, डाऊनलोडिंग वेगात होते. कारण ब्याटरी सेविंग मोड कार्यरत नसतो. परिणामी कमळाची मते भराभर स्टोर होतात. हाताची मते आपोआप डिलीट होतात.

६० टक्के चार्जिंग : ही एकंदरीतच कमी क्षमतेची यंत्रे असतात. ब्याटरीही कमी क्षमतेची असते. शिवाय ती कमी चार्ज केलेली असतात. ही यंत्रे उत्तर-दक्षिण अशा दिशेला तोंड करुन ठेवली असता चुंबकीय क्षेत्र सक्रिय होऊन मते लोहकणांसारखी इतस्तत: फेकली जातात. जेमतेम काही काँग्रेसी मते यंत्राच्या आतल्या बाजूला चिकटून राहतात. हे दक्षिणोत्तर चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे, हाच खरा फ्राँड आहे, दुर्दैवाने त्याबाबत अद्याप कोणीही वाचा फोडलेली नाही.

इव्हीएममध्ये आणखीही बरेच घोटाळे आहेत. ते आम्ही (किंवा जयरामजीकी रमेश) यथावकाश बाहेर काढूच. मात्र आमचे मित्र जयरामजीकी रमेश हे अत्यंत शास्त्रोक्त विचार करणारे उच्चशिक्षित गृहस्थ असल्याने त्यांनी इव्हीएम यंत्रातला फ्रॉड सहजी शोधून काढला. इतक्या वेगात आम्हाला ते जमले नसते! आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पाया रचणाऱ्या दोघा भौतिकशास्त्रज्ञांना यंदा नोबेल जाहीर झाले. मशिन लर्निंगमध्ये या शास्त्रज्ञांनी भरीव काम केले आहे म्हणे. फू:!! कैच्याकैच वशिलेबाजी आहे ही!

व्होटिंन मशीन लर्निंगच्या क्षेत्रात क्रांतिकारक शोध लावणाऱ्या जयरामजीकी रमेश यांनाच खरे तर नोबेल मिळायला हवे. पण म्हणतात ना, पिकते तिथे विकत नाही!!

यंत्रे म्यानेज करुन कोणीही निवडणुका जिंकेल! हॅ:!! आम्ही नाय खेळत ज्जा!!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.