Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना
esakal October 10, 2024 06:45 AM

मुंबई: भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्वात ज्येष्ठ उद्योगपती टाटा उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष रतन नवल टाटा (वय ८६) यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला देऊन ही माहिती दिली आहे. रतन टाटा यांच्याकडे बराच काळ टाटा समूहाचं अध्यक्षपद होतं. त्यांच्याकडे ही जबाबदारी नेमकी कशी आली, त्याबद्दल जाणून घेऊया.

गोष्टी १९९१ सालची आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष असलेले जेआरडी टाटा यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पाच दिवसांच्या उपचारानंतर एका शनिवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. ते थेट कार्यालयात पोहोचले. पुन्हा सोमवारी कार्यालयात हजर. कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं होतं.

थोड्या वेळाने जेआरडींनी रतन टाटांना बोलावून घेतलं. ''काय रतन, नवीन काय चाललंय?'' असा प्रश्न करताच रतन टाटा यांनी, नवीन काही नाही, जे सांगायचं होतं ते रुग्णालयात रोजच्या रोज सांगत होतो, असं उत्तर दिलं.

त्यावर जेआरडी टाटा यांनी ''रतन, माझ्याकडे काहीतरी नवीन आहे'' असं म्हटलं आणि 'टाटा सन्स'चं अध्यक्षपद तुझ्याकडे द्यायचं आहे, असा मनोदय व्यक्त केला. याबाबत संचालकांच्या बैठकीमध्ये तसा प्रस्ताव मांडण्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

यावर रतन टाटा गप्पच होते, थोड्या वेळाने त्यांनी होकार दिला. पुढच्याच आठवड्यात सोमवारी जेआरडी टाटांनी संचालकांची बैठक बोलावली. संचालकांना भोजनासाठी पारशांची पारंपारिक आमटी, पत्रानू मच्छी आणि पारशी पद्धतीचं मिष्टान्न असा बेत होता. संचालकांना ताज हॉटेलमधूनच जेवण येई.

ताज हॉटेलमधला लुकास नावाच्या खानसाम्याला संचालकांनी जेवणावळीच्या विशेष बेताबद्दल चौकशी केली. तर त्याने टाटा समूहाची सूत्र रतन टाटांकडे जाणार असल्याचं संचालकांना सांगितलं. तोपर्यंत संचालक मंडळ अनभिज्ञ होतं. नंतरच्या बैठकीत जेआरडींनी रतन टाटांचं नाव पुढे केलं. जेआरडींच्या प्रस्तावाल पालोनजी मिस्त्री यांनी अनुमोदन दिलं. सर्वांनी टाळ्यांच्या गरजरात रतन टाटांचं अभिनंदन केलं.

अशा पद्धतीने रतन टाटा यांच्याकडे टाटा सन्स या टाटांच्या पॅरेंट कंपनीचं अध्यक्षपद आलं. ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्या 'टाटायन' या पुस्तकामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.