राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
Inshorts Marathi October 10, 2024 06:45 AM

कोल्हापूर, दि. ९ ( जिमाका): शासनाने शेतकरी, कष्टकरी ,शिक्षण, महिला यांच्या प्रश्नासोबतच राज्यातील जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील विविध वास्तूंचे उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले .

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, आदिल फरास , वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे आदी उपस्थित होते .

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, एक लाख लोकसंख्येकरीता जेवढे डॉक्टर असणे अपेक्षित आहे तेवढे डॉक्टर सध्या नाहीत. तथापि, एक लाख लोकसंख्येसाठी किमान 100 डॉक्टरांची सुविधा देण्याच्या दृष्टीने सरकारची वाटचाल सुरू असून त्या अनुषंगाने विद्यमान सरकारने राज्यात नव्याने दहा वैद्यकीय रुग्णालयांची निर्मिती केली आहे . भविष्यात आणखी काही वैद्यकीय रुग्णालये उभारण्यात येतील. या कामाकरता निधीची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही देऊन कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी तब्बल 1400 कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मान्यता दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेला अद्यावत उपचारासाठी पुणे – मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व सोई – सुविधा कोल्हापूरमधूनच उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असून त्याचाच परिपाक म्हणून सुमारे 837 कोटी रुपयांच्या विविध कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच जिल्ह्यातील जनतेसाठी अद्यावत वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. या 837 कोटी रुपयांमध्ये 600 खाटांचे सामान्य रुग्णालय इमारतीचे बांधकाम , 250 खाटांचे कर्करोग रुग्णालय इमारतीचे बांधकाम, 250 खाटांचे अतिविशेष उपचार रुग्णालय इमारतीचे बांधकाम, 100 खाटांचे आरोग्य पथक स्थापन करणे, अंतर्गत रस्त्याचे काँक्रीट / विद्युतीकरण , संकुलातील वाहनतळ न्याय वैद्यकशास्त्र विभागकरिता इमारतीचे बांधकाम, जमिनीचे सपाटीकरण – सुशोभीकरण करणे , टेबल टेनिस /बास्केटबॉल / बॅडमिंटन वॉल कोर्ट आदी बांधकाम त्याचबरोबर पाच विद्यार्थी वस्तीगृहाचे बांधकाम अशा स्वरूपाचा विविध कामांचा समावेश आहे . हे सर्व बांधकाम 30 एकरातील विस्तीर्ण अशा जागेवर करण्यात येणार आहे .

०००

The post first appeared on .

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.