बॉलिवूडचा शहेनशहा
esakal October 11, 2024 04:45 AM

अतिशय नम्र, सालस, गर्व नसणारे, अभिनय करण्यात पारंगत असणारे बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्यांच्या प्रत्येक हीट झालेल्या पिक्चर्सचे सर्व डायलॉग ऐकताना तोच आनंद, तोच उत्साह, तेच हसू कायम असते. असे हे ‘अमिताभ बच्चन’, ‘बिग बी’ म्हणजे एक असामान्य व्यक्ती आहेत. आज (ता. ११) त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त एक आठवण....
-अरुणा सरवदे

३ मार्च २०१४ हा न विसरता येणारा दिवस. ज्यांच्या दर्शनाची मी आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस. त्या दिवशी पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरात ‘बिग बी’, बॉलिवूडचे शहेनशाह म्हणजेच ‘अमिताभ बच्चन’ यांना ‘पुणे पंडित’ ॲवॉर्डने सन्मानित करणारा तो दिवस. मी त्यांची फॅन असल्याने ते येणार म्हणून मला फार आनंद झाला. बच्चन येणार म्हटल्यावर साहजिकच गर्दी फार असणार आणि आपल्याला त्यांचं दुरूनच दर्शन होईल, असे मला वाटले. मी व माझी मुलगी प्रीती अशा आम्ही दोघीही तिथे गेलो. अचानक आमच्या समोर एक मुलगा आला आणि तो आम्हाला म्हणाला, ‘‘तुम्हाला पासेस हवे आहेत का?’’ आम्हालाच विश्वासच बसत नव्हता. आम्ही त्याच्याकडून पासेस घेतले. तोपर्यंत कार्यक्रम सुरू होऊन १५ मिनिटे झालेली होती. आम्हाला पासेस मिळाल्याचा इतका आनंद झाला की, आम्ही दोघीही पळतच आत गेलो. बच्चन अजून स्टेजवर यायचे होते. तिकिटाच्या नंबराप्रमाणे न बसता तिसऱ्या लाईनमध्ये एक खुर्ची रिकामी होती तिथे माझी मुलगी बसली. ती मला म्हणाली, ‘‘मम्मी तू कोठे बसणार?’’ मी म्हटले की, मी खालीच बसते. बच्चन नाही का ‘अमर अकबर अँथनी’मध्ये खुर्चीच्या बाजूला खाली बसतात तशी मी बसले. कार्यक्रम सुरू झाला. बच्चन यांचं आगमन होताच लोकांनी जोरात त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. आम्हाला तर खरंच वाटेना की, अमिताभ यांना आपण इतक्या जवळून बघतोय.
श्रीमती कुलकर्णी यांनी बच्चन यांच्याबद्दलची माहिती सांगताना ते अतिशय मन लावून ऐकत होते आणि त्यांचं लक्ष त्यावेळी जमिनीकडे होतं. नंतर अमिताभ यांनी अतिशय मोजक्या व प्रभावीपणे त्यांचं भाषण केलं. मधूनच प्रेक्षकातून एक आवाज आला, ‘गॉड ऑफ बॉलिवूड’. परत टाळ्यांचा गजर झाला. आपल्या भाषणात ते सांगत होते की, मी आज जो काही आहे ते निर्माते, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, प्रेक्षक. या सर्वांना ते श्रेय देत होते. त्यांनी मला जसं सांगितलं त्याप्रमाणे मी ते करत गेलो, असे ते म्हणत होते. माझ्या आजारपणात (कुलीच्या वेळेस) मला काही जणांनी मृत घोषित केलं होतं. तेव्हा सर्व जनतेने माझ्यासाठी देवाकडे जी प्रार्थना केली, त्यासाठी मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे, असे ते सांगत होते.
पुण्यात येण्यासाठी कामाच्या, शूटींगच्या व्यापामुळे त्यांच्याजवळ वेळ नव्हता. तेव्हा त्यांनी अतुल कुलकर्णी यांच्याकडे ४ तारखेच्या ऐवजी ३ तारीख मागून घेतली. तेव्हा मला त्यांना उठून म्हणावेसे वाटले की, कुछ दिन तो गुजारिये पूना में। माझी आई, मी व माझी मुलं अशा तिन्ही पिढ्यांचा फॅन असणारे, बॉलिवूड गाजविणारे ते शहेनशाह आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.