ढिंग टांग : कुछ कुछ होता है..!
esakal October 11, 2024 10:45 AM

आजची तिथी : क्रोधी नाम संवत्सरे श्रीशके १९४८ अश्विन शु. सप्तमी.

आजचा वार : मोटाभाईवार…याने की बुधवार!

आजचा सुविचार : क्या करुं हाये, कुछ कुछ होता है…!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेल्या आठवड्यात रात्री एक निनावी फोन आला. ‘के हाल से?’ असे समोरच्या व्यक्तीने विचारले. मी नाव विचारले. जाम सांगेना. मला आवाज आमच्या वीर विनोद तावडेजींचा वाटला. हरयाणात बरेच महिने राहिल्यामुळे त्यांना हरयाणवी बरी येते. (असा त्यांचा समज आहे.)

मी नम्रपणे ‘सत श्री अकाल’ असे म्हटले. ‘‘आपण हरियानात जिंकतोय’’ असे सांगून त्या व्यक्तीने फोन ठेवला. मला वाटले की हा फेक नॅरेटिवचा प्रकार असणार! कारण एग्झिट पोल बघितल्यानंतर मी नाद सोडला होता. काँग्रेसवाल्यांनी गोहानाच्या मातुराम हलवायाकडे दोन टन जिलेबीची ऑर्डर दिल्याचे कुठेतरी (सोशल मीडियावर) वाचून माझे तोंड कडू पडले होते.

हरियानाच्या निकालाचा महाराष्ट्रातील निवडणुकीवर ढिम्म परिणाम होणार नाही, असे उद्या सकाळी बोलायचे मी मनोमन ठरवले. सकाळी टीव्ही लावला, आणि मी मनातल्या मनात बाईट काय द्यायचा, ते ठरवू लागलो. आमच्या पक्षाची हालत गंभीर होती. पण दुपारी मी जेवणासाठी बसेपर्यंत चित्र बदललेच! आमचा पक्ष दणक्यात जिंकतोय हे बघण्याच्या नादात मी दोनदा जेवलो!! वर मिठाई म्हणून जिलेब्या मागवल्या…

काँग्रेसच्या राहुलजी गांधींनी गोहानाच्या मातुराम हलवायाच्या

जिलेब्या दाखवून आम्हाला वाकुल्या दाखवल्या होत्या. ‘हरियानात काँग्रेस की आंधी आने जा रही है, और मातुराम की जलेबियां पूरे देश में पहुंचनेवाली है’ असे त्यांनी जाहीर सभेत (जलेबीचा पुडा नाचवत) सांगितले होते.

(एकमेव) लाडक्या बहिणीसाठी पावकिलो जलेबी पार्सल करुन नेलीसुध्दा! (खवय्यांसाठी खुलासा : मातुरामची सुप्रसिध्द जलेबी एकेक पाव किलोचीच असते, म्हंजे एका किलोत फक्त चार बसतात. असो.) एग्जिट पोलचा निकालही मातुरामच्या जिलेब्या देशभर जाणार, असेच सांगत होत्या. पण घडले उलटेच!! राहुलजी आता आयुष्यभर कुठलीच जलेबी खाणार नाहीत, असे मला वाटते.

हरियानाची निवडणूक होईपर्यंत इकडे महाराष्ट्रात रोज महाविकास आघाडीचे लाडू फुटत होते. ‘हम साथ साथ है’ असे म्हणत आघाडीचे नेते एकमेकांना डोळे वटारुन दाखवत होते. पण हरियानाचे निकाल आले आणि सगळेच बदलले. ‘हम साथ साथ है’ असे म्हणणारे, एकमेकांना ‘हम आपके है कौन?’ असे थेट विचारु लागले. रोजचा म्याटिनी शोचा भांडुपचा भोंगा तर थंडच पडला.

रात्री एग्झिट पोल बघून मी जशी ‘हरियानाच्या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही,’ असे सांगायची तयारी करत होतो, तेव्हा भांडुपचा भोंगासुध्दा मनातल्या मनात जिलेब्या खात असणार!!

बरे, झाले अद्दल घडली. काँग्रेसवाल्यांची खोड मोडली. नानाभाऊ पटोले तर आमचा फोनही उचलेनासे झाले आहेत. आमच्या जुन्या मित्रांचीही पुंगी थंड झाली आहे. आमचा पक्ष जिंकला हरियानात, पण आम्ही इकडे कॉलर ताठ करुन फिरतो आहो! मज्जाच मज्जा!! जागावाटपाची चर्चा आता ‘सागर’ बंगल्यातच होतील. मी काही उठून कुठे वेषांतर वगैरे करुन जाणार नाही. यायचे तर इथेच या, असे मी आमच्या मित्रपक्षांना सांगून टाकणार आहे.

हरियानाच्या निकालानंतर मला मात्र उगाच ‘क्या करु हाये, कुछ कुछ होता है’ हे गाणे गुणगुणावेसे वाटू लागले आहे. आहा! मी पुन्हा येणार की काय?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.