Wild Animal : वन्यजीवांच्या संख्येत होतेय घट; गेल्या ५० वर्षांत सरासरी ७३ टक्क्यांनी कमी
esakal October 11, 2024 10:45 AM

नवी दिल्ली - जगभरात विविध कारणांमुळे वन्यजीवांची संख्या सातत्याने घटत असून १९७० ते २०२० या ५० वर्षांत ती सरासरी ७३ टक्क्यांनी कमी झाल्याचे वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (डब्लूडब्लूएफ)च्या नवीन अहवालात म्हटले आहे. ‘द लिव्हिंग प्लॅनेट रिर्पार्ट २०२४’ हा वन्यजीवांची सद्य:स्थिती दर्शविणारा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. अधिवास नष्ट होणे, हवामान बदल आणि प्रदूषणामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

जगभरात वन्यजीवांच्या संख्या कमी होण्यामागे ही सर्वांत सामान्य कारणे असून अतिशोषण, आक्रमक प्रजाती आणि आजारांमुळेही वन्यजीव कमी होत आहेत. भारतात सरकारच्या पुढाकारातून अधिवास व्यवस्थापन, वैज्ञानिक देखरेख आणि सार्वजनिक पाठिंब्यासह समुदायांना सहभागी करून घेतल्याने वन्यजीवांची संख्या स्थिर झाली असून काही प्रजातींच्या संख्येत वाढही झाली आहे.

वाघांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून २०२२ मध्ये देशात ३,६८२ वाघ असल्याचा अंदाज होता. २०१८ मध्ये वाघांची संख्या २,९६७ इतकी होती. हिम बिबट्यांच्या पहिल्या गणनेत देशात ७० टक्के हिम बिबटे असल्याची माहिती देण्यात आली होती.

हवामान बदलामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे स्थानिक व प्रादेशिक स्तरावर मोठ्या बदलांना आमंत्रण मिळू शकते. त्यानंतर परिसंस्थेवर अपरिवर्तनीय परिणाम होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे. चेन्नईत वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील पाणथळ जागेत ८५ टक्क्यांनी घट झाली.

त्यामुळे, या पाणथळ जागांकडून होणाऱ्या जल पुनर्भरण, पूर नियमनासारख्या गोष्टींवर विपरीत परिणाम झाला. आता चेन्नईतील बहुसंख्य जनतेला पूर व दुष्काळाचा सामना करावा लागत असून हवामान बदलामुळे या संकटाची तीव्रता वाढली आहे.

भारतात गिधाडांच्या संख्येत घट

गेल्या तीन दशकांत भारतात गिधाडांच्या तीन प्रजातींच्या संख्येत घट झाली असून १९९२ ते २०२२ या काळात गिधाडांची संख्या घटली आहे. पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या ६७ टक्क्यांनी तर भारतीय गिधाडांची संख्या ४८ टक्के कमी झाली आहे. त्याचप्रमाणे, लांब चोचीच्या गिधाडांच्या संख्येतही ८९ टक्के घट झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

हा अहवाल निसर्ग, हवामान व मानवी कल्याण यांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकतो. पृथ्वीच्या भवितव्यासाठी येत्या पाच वर्षांत आपण कोणत्या पर्यायांची निवड करतो व कोणत्या कृती करतो. या अहवालात हवामान बदल व जैवविविधतेच्या ऱ्हासावर सामुदायिक प्रयत्नांच्या तत्काळ गरजेवर भर दिला आहे.

- रवी सिंह, सीईओ, डब्लूडब्लूएफ-इंडिया

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.