रतन टाटा यांनी नवउद्यमशीलतेला दिले पाठबळ
esakal October 11, 2024 10:45 AM

रतन टाटा यांनी ५० हून अधिक स्टार्टअपना (नवउद्यम) आतापर्यंत मदतीचा हात दिला आहे. लेन्सकार्ट, डिजिटल पेमेंट ब्रँड पेटीएम, इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अपस्टॉक्स यांसारख्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

असेही श्वानप्रेम

रतन टाटा यांचे श्वानप्रेमही सर्वश्रुत आहे. टाटा सन्सचे बॉम्बे हाउस हे अनेक भटक्या श्वानांसाठी आश्रयस्थान बनले. या श्वानांचा टाटा समूहामार्फत सांभाळ केला जातो. या श्वानप्रेमातूनच शंतनू नायडू यांचा टाटा यांच्याशी संपर्क आला. ‘मोटोपॉज’ या सामाजिक उद्यमासाठी निधीच्या उभारण्याच्या अनुषंगाने संपर्क करण्यात आला. ही संस्था रस्त्यावरील श्वानांना ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’चा पुरवठा करते.

आयुष्यभर देणारे हात

रतन टाटा हे कसलेले उद्योगपती होते मात्र त्यांचे उद्दिष्ट केवळ नफा मिळविणे हे कधीच नव्हते. सामाजिक दायित्व आणि शाश्वत विकासासाठी ते आयुष्यभर वचनबद्ध राहिले. ‘आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट- २०२१’ मध्ये त्यांचे स्थान ४३३ वे होते. ते उदार दानशूर व्यक्तिमत्त्व असल्यानेच त्यांना हा सन्मान मिळाला असावा.

विद्यार्थ्यांना मदत

देशातील सर्वात मोठी चॅरिटेबल संस्था असलेल्या टाटा ट्रस्टने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी तंत्रज्ञान केंद्रे उभारली आहेत. आरोग्य सेवा, शिक्षण, ग्रामीण विकासावर आधारित प्रकल्पांना मदत केली जाते. कोरोनासारख्या महासंसर्गाविरोधात जग लढत असताना त्यांनी ५०० कोटींची मदत करून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले.

वेल्फेअर ट्रस्टची स्थापना

रतन टाटा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेला कार्यकारी केंद्रे उभारण्यासाठी पाच कोटी डॉलरची देणगी दिली. टाटा ट्रस्टने आयआयटी आणि आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्थांना कॅम्पसच्या उभारणीसाठी वित्तपुरवठा केला. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ‘ताज पब्लिक सर्व्हिस वेल्फेअर ट्रस्ट’ची स्थापना केली.

या संस्थांना पाठबळ

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

  • नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स

आव्हानांच्या गर्तेत

  • सिंगूर प्रकल्पाचा वाद (२००६-२००८)

  • राडिया टेप प्रकरण (२०१०)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.