बिबट्याच्या नसबंदीसाठी जनहित याचिका
esakal October 11, 2024 10:45 AM

सुदाम बिडकर
पारगाव, ता. १० : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संचालक मंडळ सभेत घेतलेल्या निर्णयानुसार व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात बिबट्या नसबंदी जनहित याचिका दाखल केली आहे. राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही याचिका दाखल केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
बेंडे म्हणाले, ‘‘कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आंबेगाव, शिरूर व परिसरात सध्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बिबट्यांना वास्तव्यासाठी जागा झाली आहे. बिबट्या वन्यप्राणी असून पाळीव प्राणी व जनावरे त्याचे मुख्य भक्ष्य आहे. बिबट्यांची संख्या वाढल्याने हल्ल्यांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्त्यांवर येऊ लागले आहेत. पाळीव प्राण्यांबरोबरच लहान मुले, महिला व पुरुषांवरही हल्ले होत आहेत. त्यामुळे मनुष्य व पाळीव प्राण्यांवर होणारे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी तसेच बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनामार्फत बिबट्याची नसबंदी करणे गरजेचे आहे.’’
बिबट्याची नसबंदी करण्यासाठी अॅड. तेजस देशमुख यांच्या मार्फत भीमाशंकर कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शासनामार्फत बिबट्याची नसबंदी झाल्यास बिबट-मानव संघर्ष कमी होण्यास मदत होणार असल्याचे बेंडे म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.