Tribal Girls : जमिनी बळकावण्यासाठी आदिवासींच्या मुलींचा वापर,हरावतीत पैशांच्या आमिषाने अडकवतात लग्नाच्या बेडीत
esakal October 11, 2024 06:45 PM

नागपूर : आदिवासींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या मुलींना लग्नाच्या बेडीत अडवले जाते. त्यानंतर त्यांच्या नावाचा वापर करून जमिनी बळकावण्याचा प्रकार आदिवासी भागात सर्रास सुरू आहे.

विकासाच्या नावाखाली आदिवासींना त्यांच्याच गावातून हद्दपार करण्यात येत असल्याची खंत पेसा कायदा लागू करण्यासाठी मागील २० वर्षांपासून लढा देणाऱ्या ओडिशातील कार्यकर्त्या हरावती यांनी सकाळ कार्यालयात संवाद साधताना व्यक्त केली. नागपुरात आल्या असता त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयात खास संवाद साधला. यावेळी त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षांपासून समाजाच्या हक्कासाठी करीत असलेला संघर्ष मांडला.

ओडिशा राज्यातील १३ जिल्हे हे संपूर्ण आदिवासी असून इतर जिह्यांतही आदिवासी मोठ्या संख्येने आहे. तरीही त्यांचे शोषण व जमीन बळकावण्याचे प्रकार सुरू असल्याने आदिवासी विस्थापित होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे ओडिशातही पेसा कायदा लागू करण्यासाठी लढा सुरूच राहील असा निर्धार हरावती यांनी बोलून दाखविला.

संघर्षाची बिजे सांगताना त्या म्हणाल्या, बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात निर्वासित लोक ओडिशात आले. अल्पावधीतच त्यांनी येथील जमिनी हस्तगत करण्यासाठी आदिवासींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या मुलींशी लग्न करून त्यांच्या नावे जमिनी घेण्याचा सपाटा सुरू केला. त्याविरोधात माझा संघर्ष सुरू असून अद्याप याची दखल घेतली नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.