On This Day: मॅगीवर भूक भागवण्यापासून ते टीम इंडियाचा हुकमी एक्का बनणाऱ्या हार्दिक पांड्याच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम
esakal October 11, 2024 06:45 PM

On This Day in Cricket: भारतीय क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत अनेक दिग्गज अष्टपैलू खेळाडू झाले आहेत, ज्यांनी मोठे विक्रमही नावावर केले. आता या अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याचेही नाव घेतलं जात आहे. आयपीएलमधून प्रकाशझोतात आलेल्या हार्दिक पांड्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, क्रिकेटमध्ये करियर करणे त्याच्यासाठी अनेकांप्रमाणेच कठीण होते. तो आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल हे अनेकदा मॅगी खाऊन दिवस काढायचे, ज्यामुळे पैसे वाचतील. पण नंतर हार्दिकला मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी आणि गोष्टी बदलत गेल्या.

११ ऑक्टोबर १९९३ रोजी जन्मलेला हार्दिक पाठोपाठ कृणालनेही मुंबईकडून पदार्पण केले. हार्दिकच्या अष्टपैलू खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आणि त्याचे जानेवारी २०१६ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण झाले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेडला भारतासाठी पहिला टी२० सामना खेळला. त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले.

२०१६ सालीच झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने १ धावेने विजय मिळवलेल्या प्रसिद्ध सामन्यात हार्दिकनेच अखेरच्या षटकात गोलंदाजी केली होती. हार्दिकला २०१७ मध्ये कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पणाची संधी मिळाली.

दरम्यान, भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारांमधील तो प्रमुख अष्टपैलू खेळाडू बनलेला असतानाच त्याला दुखापतीने घेरले. त्याला पाठीवर शस्त्रक्रियाही करावी लागली. अनेक महत्त्वाच्या स्पर्धाही मुकाव्या लागल्या. या शस्त्रक्रियेनंतर त्याने वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले.

मात्र, २०१८ नंतर तो कसोटी क्रिकेट मात्र खेळू शकला नाही. परंतु, तो वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये भारताचा हुकमी एक्का ठरला आहे. त्याने २०२२-२०२४ दरम्यान भारताच्या टी२० संघाचे नेतृत्वही केले.

त्याच्या कारकिर्दीत त्याने ११ कसोटी सामने खेळले असून ३१.२९ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये त्याने ८६ सामने खेळले असून ३४.०१ च्या सरासरीने आणि ११ अर्धशतकांसह १७६९ धावा केल्या आहेत, तसेच ८४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १०४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १५९४ धावा केल्या आहेत आणि ८७ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने भारताला २०२४ टी२० वर्ल्ड कप जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने तीन वेळा आशिया कपही जिंकला आहे.

आयपीएलमध्ये हार्दिकने १३७ सामन्यांमध्ये १० अर्धशतकांसह २५२५ धावा केल्या आहेत, तर ६४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मुंबईकडून ४ वेळा, तर गुजराज टायटन्सकडून एकदा त्याने विजेतेपद जिंकले आहे. त्याने मुंबईकडून खेळाडू म्हणून, तर गुजरातकडून कर्णधार म्हणून त्याने विजेतेपद जिंकले आहे.

हार्दिक पांड्याचे विक्रम
  • हार्दिक भारताकडून सर्वाधिक टी२० सामने खेळणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने १०४ सामने खेळले आहेत. त्याच्यापुढे फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. रोहितने १५९ टी२० सामने आणि विराटने १२५ टी२० सामने भारतासाठी खेळले आहेत.

  • हार्दिकने क्षेत्ररक्षक म्हणून १०४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये हे ५२ झेल घेतले आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० हून अधिक झेल घेणारा भारताचा तिसराच क्षेत्ररक्षक आहे. त्यापुढे रोहित आणि विराट आहेत. रोहितने ६५ झेल घेतलेत, तर विराटने ५४ झेल घेतलेत.

  • तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा एकमेव अष्टपैलू आहे. त्याने ७ जुलै २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध साउथम्पटनला झालेल्या सामन्यात ५१ धावा केल्या होत्या आणि ४ विकेट्स घेतल्या होत्या.

  • आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात यष्टीरक्षकाकरवी झेलच्या रुपात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही तो टीम साऊदी (२४) आणि जोशुआ लिटिल (२०) यांच्यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकांनी १७ वेळा झेल घेतला आहे.

  • हार्दिक आयपीएलमध्ये २०२२ मध्ये पहिल्यांदाच कर्णधार झाला होता आणि त्याने कर्णधार म्हणून पहिलाच हंगाम खेळताना त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.