मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बालाजी मंदिर हटवले; भाविकांतून तीव्र नाराजी, मंदिराला आहे 700 वर्षांपूर्वीचा इतिहास
esakal October 11, 2024 06:45 PM

विठ्ठला बालाजीचे प्रतिरुप मानले जाते. त्यामुळे बालाजी दर्शनानंतर अनेक भाविक विठ्ठल दर्शनासाठी हमखास पंढरपूरला येतात.

पंढरपूर : अयोध्येतील राम मंदिरातून (Ram Temple Ayodhya) साईबाबांची मूर्ती हटवल्याची घटना ताजी असतानाच आता पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातून बालाजीचे मंदिर (Balaji Temple) हटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील (Vitthal Rukmini Mandir) जतन आणि संवर्धनाचे काम सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम रडतखडत सुरु आहे. मंदिराचे काम संथगतीने सुरु असल्याची भाविकांची ओरड असतानाच मंदिरातील बाजीराव पडसाळी समोरील बालाजीचे पुरातन दगडी मंदिर हटवण्यात आल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, येथे नवीन मंदिर बांधण्यात येणार असल्याचे मंदिर समितीकडून (Temple Committee) सांगण्यात आले आहे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन आहे. मंदिराला सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास आहे. अशा या प्राचीन विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे 74 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभरापासून मंदिर संवर्धनाचे काम सुरु आहे. वर्षभरात पन्नास टक्के हून कमी काम झाले आहे.

मागील काही दिवसांपासून तर अत्यंत धिम्यागतीने काम सुरु आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्था वारंवार विस्कळीत होते. एकीकडे मंदिरातील काम संथ गतीने सुरू असतानाच दुसरीकडे मात्र मंदिरातील बालाजीचे मंदिर हटवण्यात आले आहे. त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बालाजीचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

विठ्ठला बालाजीचे प्रतिरुप मानले जाते. त्यामुळे बालाजी दर्शनानंतर अनेक भाविक विठ्ठल दर्शनासाठी हमखास पंढरपूरला येतात. आंध्र प्रदेशातून देखील विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. विठ्ठल दर्शनानंतर भाविक येथील बालाजीचे मनोभावे दर्शन घेतात. मंदिर जतन आणि संवर्धनाच्या नावाखाली मंदिर समितीने चक्क बालाजीचे मंदिर हटवण्यात आल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अयोध्येतील राम मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता विठ्ठल मंदिरातून बालाजीचे मंदिर हटवण्यात आल्याने बालाजी भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

विठ्ठल मंदिरातील बालाजीचे मंदिर हटवण्यात आल्याची माहिती नाही. हटवले असेल तर तो मंदिरातील कामाचा एक भाग आहे. त्या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे. मंदिराचे काम संथगतीने सुरु आहे हे खरे आहे. या संदर्भात मंदिर समितीची बैठक होणार आहे. बैठकीत संबंधित ठेकेदाराला काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

-गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

विठ्ठल मंदिरातील बालाजीचे मंदिर हटवणे चुकीचे आहे. मंदिर हटवण्यापूर्वी वारकऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. परंतु, तसे न करता मनमानीपध्दतीने बालाजीचे मंदिर हटवले आहे. या संदर्भात मंदिर समितीने लेखी खुलासा करावा.

-विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.