Latest Maharashtra News Updates : ओमर अब्दुल्ला थोड्याच वेळात घेणार जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ
esakal October 16, 2024 02:45 PM
Omar Abdullah Live: ओमर अब्दुल्ला थोड्याच वेळात घेणार जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) जेथे JKNC उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आज जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

Bangalore Rain LIVE : बंगळुरात मुसळधार पाऊस, शाळा-महाविद्यालयांना आज सुटी जाहीर

बंगळूर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बंगळूरमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज (ता. १६) सुटी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबावामुळे कर्नाटकच्या मध्यवर्ती भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बंगळूरमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वरुणाचे वादळ राज्यात आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Amravati Crime : अमरावतीत भरचौकात तरुणाची हत्या; पाठलाग करुन चौघांनी संपवलं

अमरावती : अमरावतीमध्ये भरचौकात एकाची हत्या करण्यात आली आहे. शहरातील रतनगंज परिसरातील गोलू उसरेटे या 30 वर्षीय युवकावर चित्रा चौकात चार जणांकडून जुन्या वादातून धारदार चायना चाकूने हल्ला करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने अमरावती शहर हादरुन गेले आहे.

CM Siddaramaiah LIVE : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरुद्ध राज्यपालांकडे आणखी एक तक्रार

बंगळूर : मुडा घोटाळ्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापुढे आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. अर्कावती वसाहतीतील रहिवाशांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली आहे. शिवलिंगप्पा, वेंकटकृष्णप्पा, रामचंद्रय्या, राजशेखर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि बीडीए आयुक्त आणि अर्कावती वसाहतीतील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 13 वर्षीय मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 13 वर्षीय लहान मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला. आरोपीने लहान मुलीला रेल्वे स्टेशन येथील हॉटेलच्या रूममध्ये नेऊन अत्याचार केला. ट्रेनिंगसाठी मुंबईला निघायचे सांगून तिला रेल्वे स्टेशनवर बोलून घेतले. आरोपी शिवाजी जगन्नाथ याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Indigo Airlines LIVE : लखनौला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

जयपूर, राजस्थान : दम्मम (सौदी अरेबिया) येथून लखनौला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा धमकीचा मेल आला होता. मात्र, तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

Ichalkaranji Bar Association Election LIVE : इचलकरंजी बार असोसिएशनसाठी २४ ला मतदान

इचलकरंजी : दि. इचलकरंजी बार असोसिएशनचा ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२६ या दोन वर्षांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मतदान २४ ऑक्टोबरला होणार असून, त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव खजिनदार व सदस्यपदासाठी ही निवडणूक होणार आहे. तीन महिन्यांपूर्वी दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला होता.

Weather Update LIVE : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात काही ठिकाणी ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे, तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. दुसरीकडे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Maharashtra Vidhansabha Election LIVE : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात रणधुमाळी, 20 नोव्हेंबरला होणार मतदान

Latest Marathi Live Updates 16 October 2024 : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला. राज्यात एकाच टप्प्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियांका गांधी-वद्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील दोन-तीन दिवस हवामान विभागाने राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, महाराष्ट्रातील कोअर कमिटीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची आज बैठक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये महायुतीची आगामी निवडणुकीसाठीची भूमिका जाहीर होऊ शकते. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.