Latest Pune News: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी १८ किंवा १९ ऑक्टोबरला जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडुनच पहिल्या यादीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. दरम्यान, मंगळवारी पुण्यासह राज्यभरातील पक्षातील नेत्यांसह विविध पक्षातील इच्छुकांकडुन पवार यांच्या भेटीसाठी मोदीबागेत अक्षरशः रिघ लागल्याचे चित्र होते.
राज्यातील विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय पक्षांची घाईगडबड सुरू झाली आहे. पक्षातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यापासुन ते महाविकास आघाडीतील जागा वाटप करण्यापर्यंतच्या बैठका, चर्चां झडु लागल्या आहे. त्यातच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी दिवसभर मोदीबागेतील कार्यालयात इच्छुकांना भेटीसाठी उपलब्ध होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विलास लांडे हे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचे भाऊ डॉ.अमोल बेनके यांना घेऊन पवारांच्या भेटीसाठी आले होते. "आपण डॉक्टर असून, ही राजकीय चर्चा करण्याची भेट नव्हती' असे डॉ.बेनके यांनी स्पष्ट केले. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील मंगळवारी मोदीबागेतील कार्यालयात उपस्थित होते.
हिंगोली येथील पक्षाचे नेते जयप्रकाश दांडेकर यांनी हिंगोली मतदारसंघासाठी पवार यांची भेट घेतली. त्यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे, मात्र तेथुन दोनदा कॉंग्रेसचा उमेदलार पराभुत झाला आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आपल्या पक्षाकडे घेऊन अनिल पतंगे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी पवार यांच्याकडे केली. बीडचे खासदा बजरंग सोनवणे यांनीही मोदीबागेत हजेरी लावुन बीडमधील पक्षाच्या उमेदवारीबाबत चर्चा केली.
बारामती विधानसभेबाबतही चर्चाअजिन पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही पवार यांची भेट घेतली. याबरोबरच भाजपचे नेते व राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनीही मंगळवारी मोदीबागेत उपस्थित राहुन पवार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
--------
शेतकऱ्यांच्या मुलांना विधानसभेत पाठविण्यासाठी भेट - रविकांत तुपकर"आम्ही महाविकास आघाडीसमवेत जावे अशी सहकाऱ्यांची भावना आहे. आम्ही 24 जागांसाठी तयारी करत आहोत.शेतकऱ्यांसाठी लढणारी मुले आमच्यासमवेत आहेत. त्यांना विधानसभेत पाठवावे, अशी आमची मागणी आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमवेतही याबाबतच चर्चा केली आहे, आता पवार यांच्याशी देखील हीच चर्चा केली आहे.' रविकांत तुपकर, शेतकरी संघटनेचे नेते.