प्रतिनिधी/ बेंगळूर
सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-निजद युतीमध्ये प्रतिष्ठेची लढत होणाऱ्या राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानुसार कर्नाटकातील शिग्गाव, चन्नपट्टण आणि संडूर विधानसभा मतदारसंघांत 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
18 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. अर्ज दाखल करण्यास 25 ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे. तर 28 ऑक्टोबरला अर्ज छाननी होणार आहे. 30 ऑक्टोबर माघार घेण्यासाठी अंतिम मुदत आहे. 13 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, बसवराज बोम्माई आणि ई. तुकाराम हे तिघे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रामनगर जिल्ह्यातील चन्नपट्टण, हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव आणि बळ्ळारी जिल्ह्यातील संडूर विधानसभा मतदारसंघ रिक्त झाले होते. मंगळवारी येथील पोटनिवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
चन्नपट्टणमधील लढत लक्षवेधी ठरणार!
चन्नपट्टण मतदारसंघातील पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. येथे एकूण 2,31,263 मतदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत कुमारस्वामींनी भाजपचे उमेदवार सी. पी. योगेश्वर यांचा 15,915 मतफरकाने पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप-निजदने युती केली होती. पोटनिवडणुकीसाठीही युती कायम राहणार असल्याने चन्नपट्टणमधील उमेदवारी दोहोंपैकी कोणत्या पक्षाला मिळेल, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. कुमारस्वामी आणि योगेश्वर हे एकमेकांची कट्टर राजकीय वैरी आहेत.
त्यामुळे योगेश्वर यांनी तिकीट मिळविण्यासाठी भाजप हायकमांड स्तरावर प्रयत्न चालविले आहेत. तर दुसकीकडे निजदतर्फे कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांना तिकीट देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे येथील तिढा कायम आहे. दुसरीकडे काँग्रेसमधून कोणाला तिकीट देणार, याचा निर्णय झालेला नाही. मात्र, कुमारस्वामी आणि योगेश्वर यांना कडवे आव्हान देण्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपणच येथील काँग्रेसचा उमेदवार असल्याचे अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे येथील लढत चुरशीची होणार हे नक्की.