बाळापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार नितीन देशमुखांविरूद्ध महायुतीतील कोण पक्ष लढणार? ‘वंचित’ आपला गड परत मिळवणार?
अंकिता खाणे October 18, 2024 07:13 PM

बाळापूर: शिवसेनेतील फुटीच्या वेळी सुरूवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला ( आसाम ) जाऊन पुन्हा उद्धव ठाकरे यांना साथ देणारे आमदार नितीन देशमुख त्या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात चर्चेत आले. ठाकरेंना साथ दिल्यानंतर आमदार देशमुख यांना चौकशीच्या ससेमिरीला तोंड द्यावं लागलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत महायुती आणि वंचितच्या उमेदवारांशी दोन हात करावे लागणार आहे. 

अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघातील चार ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर अकोला पश्चिमची जागा रिक्त आहे. तर, अकोला पूर्व, अकोट, मूर्तिजापूर येथे भाजपचे आमदार आहेत. फक्त बाळापूर येथून शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार देशमुख हे प्रतिनिधित्त्व करतात. महायुतीतील शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी ( अजितदादा पवार ) आणि भाजपचीही बाळापूर मतदारसंघावर नजर आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अकोला जिल्ह्यात शत-प्रतिशतचा नारा दिला आहे. जिल्ह्यात चार मतदारसंघावर ताबा असलेल्या भाजपनं बाळापूरही आपल्याकडे घेण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे.  

भाजपकडून सहा ते सातजण इच्छुक 

थेट अमित शहा यांनी जिल्ह्यामय भाजप करण्यासाठी लक्ष घातल्यानं इच्छुकांच्याही मनात आमदार होण्याचं वेध लागलं आहे. बाळापूरमधून लढण्यासाठी भाजपमधील सहा ते सात जण इच्छूक आहेत. त्यात दोन माजी आमदारांचा समावेश आहे.

शिंदे गटाकडून घेरण्याची रणनीती...

शिवसेना फुटीनंतर नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र, नंतर गुवाहाटीवरून ते महाराष्ट्रात परते आणि ठाकरेंच्या गोटात सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाकडून नितीन देशमुख यांना घेरण्याची रणनीती आखण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाळापूर परंपरागत मतदारसंघ असल्याचं सांगून शिंदे गटानं हा मतदारसंघ सोडण्याची मागणी केली आहे. येथून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांच्यासह आजी, माजी पदाधिकारी असे सात ते आठ जण इच्छुक आहेत. 

राष्ट्रवादीही आग्रही...

महायुतीतील राष्ट्रवादीनंही ( अजितदादा पवार ) बाळापूर मतदारसंघावर दावा केला आहे. 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्रवादीतील संग्राम गावंडे यांनी निवडणूक लढवत 16 हजार 497 मते घेतली होती. यंदाही राष्ट्रवादीतील तीन ते चार जण बाळापूरमधून लढण्यासाठी आग्रही आहेत. 

वंचित बालेकिल्ला पुन्हा मिळवणार?

बाळापूरमध्ये 2009 मध्ये भारिप-बमसं‍ समर्थित अपक्ष आणि 2014 मध्ये भारिप-बमसंचे बळीराम सिरस्कार सलग 10 वर्ष आमदार होते. 2019 मध्ये वंचित आघाडीने त्यांचे तिकिट कापून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र काँग्रेसमधून आलेले आणि माजी आमदार नातिकोद्दिन खतीब यांना वंचितनं उमेदवारी दिली आहे. 

2019 मध्ये काय घडलं होतं?

नितीन देशमुख – शिवसेना – 69,434 
धैर्यवर्धन पुंडकर – वंचित बहुजन आघाडी – 50,555
रेहमान खान - ‘एमआयएम’ – 44,507
संग्राम गावंडे – राष्ट्रवादी – 16,594

विजयी – नितीन देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीचे पुंडकर यांचा 19 हजार मतांनी पराभव केला होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.